सांगली/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बनेवाडी येथे ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन वर्षांच्या एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला...
सांगली/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बनेवाडी येथे ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन वर्षांच्या एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलाने ट्रॅक्टरचा क्लच दाबल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला. तेजस श्रीरंग माळी असे या तीन वर्षांच्या बालकाचे नाव आहे. गुरुनाथ श्रीरंग माळी हा त्याचा चार वर्षांचा भाऊ ट्रॅक्टरमधून खाली पडल्याने बचावला. ही दुर्घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. कवठेमहाकाळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.
बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. शनिवारी (24 जानेवारी) ते शेतीतील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. गुरुनाथ आणि तेजस ही त्यांची दोन्ही मुलेही सोबत शेतात आली होती. दिवसभरात शेतातील कामे उरकून श्रीरंग माळी घरी जाण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसले. त्यांची दोन्ही मुलेही ट्रॅक्टरवर बसलेली होती; मात्र शेतीकामासाठी आणलेले काही साहित्य विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे श्रीरंग माळी विसरलेले साहित्य आणण्यासाठी गेले. नेमक्या याच वेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या तेजसचा पाय ट्रॅक्टरच्या क्लचवर पडला. त्यामुळे अगोदरच उताराला उभा असलेला ट्रॅक्टर वेगाने पळाला. तो थेट समोर असलेल्या विहिरीत जाऊन पडला. ट्रॅक्टरवर बसलेला चार वर्षांचा मुलगा ट्रॅक्टरवरुन पडला; मात्र तीन वर्षांचा चिमुरडा ट्रॅक्टरवरच राहिला. त्यामुळे तो ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरुन खाली पडलेला मुलगा जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे. माळी दाम्पत्याने आपल्या तीन वर्षांच्या निरागस मुलाला गमावल्याने त्यांच्यावर डोंगरच कोसळला आहे.