मोरगिरी / वार्ताहर : पाटण तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अन सुरु असलेली रणधुमाळी यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. तर द...
मोरगिरी / वार्ताहर : पाटण तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अन सुरु असलेली रणधुमाळी यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. तर देसाई गटाचा असलेला बालेकिल्ला तालुक्यातील मोरणा विभाग या विभागात देसाई-पाटणकर गट सज्ज झाले आहेत. मात्र, तत्पूर्वीच आटोली व आंबेघर तर्फ मरळी या दोन ग्रामपंचायती ना. शंभूराज देसाई गटाच्या बिनविरोध लागल्या आहेत तर गोकुळ तर्फ पाटण, वाडीकोतावडे, धावडे, कोकिसरे, काहीर, पेठशिवापूर, डोंगळेवाडी व पाचगणी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.
मोरणा विभागतील एकूण दहा ग्रामपंचायत निवडणुका असून त्या पैकी आटोली व आंबेघर तर्फ मरळी या दोन ग्रामपंचायती देसाई गटाच्या बिनविरोध झाल्या असून देसाई गटाच्याच विचाराच्या असणर्या धावडे व पाचगणी या दोन ग्रामपंचायतीनची अंशतः निवडणूक लागली आहे. काहीर व डोंगळेवाडी या दोन ग्रामपंचायतीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. गोकुळ तर्फ पाटण, वाडीकोतावडे, कोकिसरे पेठशिवापूर या चार ग्रामपंचायतीत देसाई गट व पाटणकर गट यांच्यात जोरदार लढत होईल. यामध्ये गोकुळ तर्फ पाटण ग्रापंचायत गत पंचवार्षिकला देसाई गटाकडून पाटणकर गटाने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या वेळेला किसान गालवे (नाना) यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे. वाडीकोतावडे ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच तुकाराम सुर्वे हे देसाई गटाचीच सत्ता अबाधित राखतील, अशी शक्यता दिसून येत आहे. माजी पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार यांनी कोकिसरे ग्रामपंचायत निवडणुकीत आखलेले मास्टर प्लेनिंग या पुढे विरोधक किती तग धरणार हे येणारा काळ सांगून जाईल. पेठशिवापूर ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई गट व पाटणकर गट या दोन्ही गटात बंडखोरी झाल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. मात्र, देसाई गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू तर पाटणकर गटाकडून संजय हिरवे व लखन मोरे यांची कोणती राजकीय खेळी आखणार हे येणार्या काळात दिसून येईल. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोरणा विभागात देसाई गट व पाटणकर गट यांच्यात जोरदार चुरस पहायला मिळणार आहे.