इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा. नारायण खरजे यांनी राष्ट्रवादी कॉंग...
इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा. नारायण खरजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जल संपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. राजू जानकर यांची युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व प्रा. नारायण खरजे यांची प्रदेश सचिवपदी निवड केली असून दोन्ही नूतन पदाधिकार्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी श्री. जानकर व प्रा. खरजे यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत करून यथोचित सत्कार केला. यावेळी अवधूत कस्तुरे (बलवडी), प्रा. प्रवीण गावडे (इस्लामपूर), हॅन्डबॉल प्रशिक्षक शशिकांत पवार प्रामुख्याने उपस्थित होते. राजू जानकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आम्हास राज्य पातळीवर काम करण्याची संधी देवून आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो येत्या सहा महिन्यात जोरदार काम करून सार्थ करून दाखवू. प्रा. खरजे म्हणाले, पूर्वी समाजाचे, युवकांचे प्रश्न राहिले बाजूला आमच्या नेत्याची फक्त स्टंटबाजी चालू होती. मात्र, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, व ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोर-गरीब कुटुंबातील युवकांच्या हाताला काम देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करू. साहेबांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी जीवाचे रान करून पार पाडू.