पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक संकष्ट चतुर्थीस शिवाजीनगर, पिंपर...
पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक संकष्ट चतुर्थीस शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव आगारातून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवाजीनगर, तळेगाव आगारातून प्रतिप्रवासी ८४०, तर पिंपरी-चिंचवडमधून ८८० रुपये आकारणी करण्यात येणार आहे.
अष्टविनायक दर्शन गाडय़ा थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजनगाव दर्शन करून ओझर येथे मुक्कामी असतील. ओझर गणपती देवस्थान येथे अल्प दरात मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा खर्च प्रवाशाने करायचा आहे. जानेवारीमधील संकष्टी ३१ तारखेला असून, या दिवशीच्या बससाठी आरक्षण प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी स्वारगेट स्थानकातून दर रविवारी महाबळेश्वर दर्शन बसही सुरू करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शिवाजीनगर आगारातून ११ मारुती दर्शन ही बस धावणार आहे. २३ जानेवारीला सकाळी सात वाजता शिवाजीनगर स्थानकातून ही बस सुटेल. ११ मारुती दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ती शिवाजीनगरला पोहोचेल. या प्रवासासाठी ७९५ रुपयांची तिकीट आकारणी केली जाणार आहे. संबंधित बस आरक्षणासाठी उपलब्ध असून, या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.