डेहराडून : मकर संक्रांतिच्या निमित्ताने गुरुवारी भाविकांनी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे गंगास्नानासाठी अलोट गर्दी केली होती. दरवर्षी 14 जान...
डेहराडून : मकर संक्रांतिच्या निमित्ताने गुरुवारी भाविकांनी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे गंगास्नानासाठी अलोट गर्दी केली होती. दरवर्षी 14 जानेवारी रोजी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. धनू राशीतून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच 14 जानेवारीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरूवात होते. उत्तराखंड राज्यात यास उत्तरायणी असे म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी भाविक गंगा नदीत अंघोळ करण्यासाठी येतात. यावेळी हरिद्वारमधील घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होते.
संक्रांतिच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटेपासूनच नदीच्या घाटावर भाविक येण्यास सुरुवात झाली गंगा नदीत स्नान करण्यासाठी हरिद्वारमध्ये महत्त्वाचे 5 घाट आहेत. ब्रम्हकुंड, नारायणी स्त्रोत, विष्णू घाट शिला, कुशावर्त आणि रामघाट हे पाच घाट महत्त्वांचे असून येथे भाविक गंगा नदीत डुबकी घेण्यासाठी गर्दी करतात. मकर संक्रांतीच्या पाश्वभूमीवर या पाच घाटांशिवाय इतरही ठिकाणीही भाविकांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात आली होती. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगा नदीत अंघोळ करणं पवित्र मानलं जाते. त्यामुळे भाविक महास्नान करण्यास मोठ्या प्रमाणात जमतात.