पारनेर/प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसिल कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याकामी तालुक्यातील प्राध...
पारनेर/प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसिल कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याकामी तालुक्यातील प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु 112 प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणास दांडी मारली, त्यामुळे या सर्वांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटिसा पाठवून खुलासा मागवला आहे.
प्रशिक्षणास अनुपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 45 निवडणूक अधिकारी क्रमांक 1, 14 अधिकारी क्रमांक 2 ,12 अधिकारी क्रमांक 3,10 व शिपाई 31 असे एकूण 112 अनुपस्थितीत राहिले होते पैकी पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज मधील 23 प्राध्यापकांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे असलेल्या प्रशिक्षणाला अनुपस्थिती दर्शवली यातील 112 जणांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटिसा बजावल्या आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 प्रशिक्षणासाठी उपस्थित न राहिल्यामुळे न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज पारनेर येथील प्राध्यापकांना तहसीलदार यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. नुसार आपणास मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे सदर नियुक्तीचे आदेश आपणास बजावण्यात आलेले आहेत तथापि 2 जानेवारी रोजीच्या प्रशिक्षणास आपण अनुपस्थित राहिले त्याबाबत आपण कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना या कार्यालयास सादर केली नाही यावरून आपण जाणीवपूर्वक सदर कामासाठी अनुपस्थित राहिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आपणाविरोधात शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्याचा अहवाल आपल्या कार्यालयाचे विभाग प्रमुख राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात येऊ नये याबाबत आपला लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून 24 तासाच्या आत माझ्याकडे समक्ष सादर करावा. असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.