वाढदिवसानिमित्त गोविंदराव जावळे यांच्याकडून केंद्रासाठी 20 गुंठे जमीन दान लोणंद / वार्ताहर : हरळी, ता. खंडाळा येथे विपश्यना केंद्र उभारण्यास...
वाढदिवसानिमित्त गोविंदराव जावळे यांच्याकडून केंद्रासाठी 20 गुंठे जमीन दान
लोणंद / वार्ताहर : हरळी, ता. खंडाळा येथे विपश्यना केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. हरळी गावचे सुपुत्र असलेले गोविंदराव जावळे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे लोकांनी स्वागत केलेले असून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. याच अनुषंगाने यास प्रतिसाद म्हणून उद्योजक नामदेव बरकडे यांनी या केंद्रासाठी 25 हजार रूपये देणगी देण्याची घोषणा केली. स्मारक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयकुमार खरात यांनी तीन हजार रुपयाचा चेक दिला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील खंडाळा तालुक्याच्या भूमीवर हरळी गावात विपश्यना केंद्र होण्याच्या हालचाली सुरू होत असताना हे केंद्र सातारा जिल्ह्यातील आदर्श विपश्यना केंद्र होईल. यासाठी सर्वजण कटिबध्द असल्याचे म्हटले जाते आहे.
यावेळी विविध पक्षातील विविध संघटनेतील ज्येष्ठ मंडळी बापू भोसले, सर्जेराव भोसले, संजय जाधव, महेश जावळे, उत्तमराव वाघमारे, नितीन कदम, मनोहर जावळे, दत्तात्रय कडाळे, उद्योजक नामदेव बरकडे, बापूसाहेब बरकडे, उद्योजक मधुकर बरकडे, उद्योजक अभिजीत शिंदे, शामराव निकम, युवराज खुंटे, अमित भटकर, राहुल निकम, अप्पासाहेब निकम, भाऊसाहेब निकम, नागेश शिंदे, अनिल बरकडे आदी मान्यवर खंडाळासह बावडा, शिरवळ, भादे, लोणी, भोळी, सुखेड, अहिरे व पंचक्रोशीतून उपस्थित होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नामदेव बरकडे म्हणाले की, गरज पडल्यास पंचवीस हजार नव्हे तर त्याही पेक्षा अधिक प्रमाणात निधी लोकवर्गणीतून जमा करू अशी ग्वाही दिली. विपश्यना केंद्रासाठी जी 20 गुंठे जागा गोविंद जावळे यांनी दान केली. त्या जागेचे कागदपत्र व चेक जमलेली रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सहसचिव संजय जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. विपश्यना केंद्राच्या माध्यमातून खंडाळा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेण्यात येईल. खंडाळा तालुक्याच्या इतिहासात विपश्यना केंद्रामुळे खंडाळा तालुक्याचे व हरळी गावाचे नावलौकिक होईल, असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.
गोविंद जावळे म्हणाले की, भगवान बुध्दांनी दिलेल्या दान पारमितामुळे खंडाळा तालुक्याच्या इतिहासात हरळी गावाचे नाव लौकिक व्हावे. म्हणून मी वीस गुंठे जागा विपश्यना केंद्रसाठी दान देत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयकुमार खरात यांनी केले शेवटी स्नेहभोजन कार्यक्रम झाला.