मटकाबुकीकडे पोलिसांसह पालिकेकडून कानाडोळा सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील प्रसिध्द राजवाड्यासमोरील चौपाटीच्या स्थलांतराणासह जागा वाटपामध...
मटकाबुकीकडे पोलिसांसह पालिकेकडून कानाडोळा
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील प्रसिध्द राजवाड्यासमोरील चौपाटीच्या स्थलांतराणासह जागा वाटपामध्ये आलेल्या विघ्नांमुळे रिकाम्या जागेवर सध्या मटकाबुकीचा धंदा जोरात सुरु आहे. चौपाटीवरील स्थालांतरीत केलेल्या काही टपर्यांच्या आडोशाने सुरू असलेल्या या धंद्याकडे सातारा नगरपालिकेसह शाहूपुरी पोलिसांनी कानाडोळा केला असल्याचे दिसून येत आहे. चौपाटीवरील व्यावसायिकांमध्ये पडलेल्या दोन गटामुळे जागेचे वाटप रकडले आहे. जागा वाटप न झाल्याने सर्व व्यावसायिक सध्या घरात बसून आहेत, अशा स्थितीत मटकाबुकींचा धंदा मात्र जोमाने सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सातारा शहरातील राजवाड्यासमोरील मोकळ्या जागेत 40 वर्षांहून अधिक काळ चौपाटी सुरू होती. नंतरच्या काळात चौपाटी विस्तारली आणि त्या ठिकाणच्या व्यावसायिकांची संख्या शेकड्याहून अधिक झाली आहे. राजवाड्यासमोरील ही चौपाटी स्थलांतरीत करण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेत पर्यायी जागेचा शोध सुरू केला. शोधाअंती चौपाटीसाठी त्याच परिसरातील आठ गुंठे जागा निवडण्यात आली. निवडलेल्या जागेचे सपाटीकरण केल्यानंतर त्याठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाला खाद्यगाडे लावण्यासाठी किती जागा द्यायची, याचा आराखडाही तयार करण्यात आला. जागेची मोजमापे व आखणी झाल्यानतंर नवीन जागेत 72 गाडेच बसणार असल्याचे समोर आले. कमी व्यावसायिकांना नवीन जागेत स्थान मिळणार असल्याने चौपाटीवरील व्यावसायिकांच्यात दोन गट निर्माण झाले.
एक गट चौपाटीसाठी दुसरी जागेच्या मागणीवर ठाम आहे, तर दुसरा गट पालिकेने निवडलेल्या जागेवर व्यवसाय सुरू करण्यावर अडून बसला. जागा वाटपाचा निर्णय रेंगाळला असताना चौपाटीच्या जागेत एका मटकाबुकी आता बसू लागला आहे. या बुकीने एका कोपर्यात टपरी टाकत मटका घेणे सुरू केले आहे. या मटक्याकडे शाहूपुरी पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष आहे. गेल्या दहा महिन्यांहून अधिक काळ चौपाटी बंद असल्याने त्यावर अवलंबून असणार्या व्यावसायिक मात्र, रस्त्यावर आले आहेत. दरम्यान, राजवाडा चौपाटीच्या स्थलांतरावरून तेथील व्यावसायिकांत दोन गट तयार झाले. त्यामुळे पालिकेने चौपाटीवरील जागा सोडत पध्दतीने वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन दोन महिने होऊनही जागेचे वाटप झालेले नाही.