मुंबई : बहुप्रतिक्षित कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला. बृहन्मुंबई महानगर...
मुंबई : बहुप्रतिक्षित कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. महानगरपालिका आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दोन वाहनांच्या कडक बंदोबस्तात ही लस मुंबईत आणली.
मुंबईत एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा साठा घेऊन येणाऱ्या वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून स्वागत करण्यात आले. ही लस मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात दोन वॉक इन कुलर्स, रेफ्रिजरेटर यामध्ये ठेवण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून १ लाख ३९ हजार ५०० लसीचे डोस मुंबईला देण्यात आले आहेत. उपलब्ध लसीचे वितरण ९ रुग्णालयातील केंद्रांवर करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर यांचा समावेश आहे.