पाटण / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत र...
पाटण / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानून अनेकजण रक्तदानासाठी पुढाकार घेत आहेत.
रक्तदानाने आदरांजली वाहण्याचा आधार संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आधार संस्थेचा रक्तदान शिबीर उपक्रम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार विलासराव क्षीरसागर यांनी काढले. स्व. सौ. वेणुताई उपजिल्हा रुग्णालय कराड व ग्रामीण रूग्णालय पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दिनकरराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदानशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. सी. के. यादव, डॉ. शहाजी शेळके, नितीन पिसाळ, जयसिंगराव जगताप, शिवाजीराव जगताप, यशवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विलासराव क्षीरसागर पुढे म्हणाले की, रक्तदानासारख्या मानवतावादी कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. आधार सारख्या संस्था समाजाच्या आधार बनत आहेत. रक्तदान हे जीवनदान असुन सर्वश्रेष्ठ दान आहे. समाजाचे प्रत्येकजण देणे लागतो. ती बांधिलकी आधार संस्थेने जोपासली आहे. संस्थेचा प्रत्येक उपक्रम समाजाला मार्गदर्शक व आदर्शवत आहे. रक्तदानाने आदरांजली वाहण्याचा संस्थेचा अनोखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विलासराव क्षीरसागर यांनी यावेळी केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, रक्तदानासंबधी अजुनही समाजामध्ये फारशी जागृती नाही. आपण दिलेल्या रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचु शकतात. कर्णानंतर दानशूर हा रक्तदाताच आहे. प्रत्येकालाच युध्दभूमिवर जाऊन देशासाठी रक्त सांडता येत नाही. शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तदान केल्यामुळे गरीब, गरजूंना आपले रक्त उपयोगी पडते याचे समाधान मिळते. देण्यातील आनंद हा वेगळाच ही सुध्दा एक प्रकारे देशसेवाच आहे. डॉ. सी. के. यादव म्हणाले, रक्तदानाचा लाभ केवळ रक्त घेणार्यालाच होत नाही तर देणार्याला सुध्दा होतो. रक्तदानामुळे नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. रक्तदानासंबधी गैरसमज दूर करुन रक्तदात्यांनी पुढे यावे, असेही आवाहनही त्यांनी केले. स्वागत व प्रास्तविक शेखर धामणकर यांनी केले. आभार सुरेश चव्हाण यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी नंदकुमार शेडगे, सुरेश चव्हाण, शेखर धामणकर, योगेश चौधरी, विकास डोंगरे, कन्हैया घोणे, गणेश बीचकर, साद खतीब, प्रविण पडवळ, लक्ष्मण पाटील, प्रसाद वळसंग, प्रमोद पाटेकर, सुरेश कळके, सोमनाथ आग्रे, स्वप्निल नेवरेकर आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी 51 जणांनी उस्फूर्त रक्तदान केले.