वडूज नगरपंचायतीने राबवली श्रमदान मोहीम वडूज / प्रतिनिधी : प्रत्येकाने आपल्या आयुष्यातून प्लास्टिकला हद्दपार केले पाहिजे. या वसुंधरेला जपण्य...
वडूज नगरपंचायतीने राबवली श्रमदान मोहीम
वडूज / प्रतिनिधी : प्रत्येकाने आपल्या आयुष्यातून प्लास्टिकला हद्दपार केले पाहिजे. या वसुंधरेला जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगविले पाहिजे, असे मत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण 2021 या अभियानाच्या निमित्ताने आज वडूज नगरपंचायतीच्या वतीने श्रमदान मोहीम राबविण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, या मोहिमेअंतर्गत शहरातून दैनंदिन जमा होणारा ओला व सुका कचरा वर्गीकरण, तसेच डंपिंग ग्राऊंडवर अस्थाव्यस्थ झालेले प्लास्टिक संकलन करण्यात आले. या मोहिमेत एकूण 62 पोती प्लास्टिक संकलित केले. यातील 7 पोती प्लास्टिक हे पॅकेजिंग, वेष्टन वेगळे करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे कमी करण्यासाठी वारंवार नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे.
खांडेकर पुढे म्हणाले, आज घडीला प्लास्टिकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याची गंभीर परिणाम प्राणिमात्रांवर आणि मनुष्य आरोग्यावर देखील झाले आहेत. शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई केली असताना सुध्दा त्याची सर्वत्र पायमल्ली सुरू आहे. जितक्या सहजतेने प्लास्टिकने आपले जाळे विणले आहे त्यासाठी ते सोडविणे, अस्तित्व मिटविणे गरजेचे बनले आहे.
श्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी सर्वोतपरी काळजी घेत आरोग्य निरीक्षक काटकर तसेच सर्व आरोग्य, सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व स्वतः मुख्याधिकारी माधव खांडेकर अग्रस्थानी होते.