मुंबई/प्रतिनिधीः बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीनअर्ज ...
मुंबई/प्रतिनिधीः बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीनअर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे. टीआरपी वाढविण्यासाठी दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.
दरम्यान, गेल्या
महिन्यात पुण्यातून अटक केल्यानंतर पार्थो दासगुप्ता (वय 55) यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी वाढवली होती. त्या वेळी गुन्हे शाखेने गोस्वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली. टीआरपी वाढविण्यात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याबद्दल पार्थो यांना अर्णब हे लाखांची लाच देत होते. त्यातून दासगुप्ता यांनी मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता व दागिने विकत घेतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. दरम्यान, अर्णब-दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही समोर आले आहेत. यामध्ये अनेक कथित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यानुसार, अर्णब यांना बालाकोट एअर स्ट्राईक आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबतची माहिती आधीच कळाली होती, हेदेखील कथित स्वरुपात समोर आले आहे.