कोतूळजवळील घटना; दोघे पोहून बाहेर पडल्याने वाचले अकोले/प्रतिनिधी : रस्ते माहीत नसले, की पूर्वी विचारत विचारत जाता यायचे. आता गुगल मॅप आणि जी...
कोतूळजवळील घटना; दोघे पोहून बाहेर पडल्याने वाचले
अकोले/प्रतिनिधी : रस्ते माहीत नसले, की पूर्वी विचारत विचारत जाता यायचे. आता गुगल मॅप आणि जीपीआरएससारख्या यंत्रणा आल्या; परंतु त्यांच्यावर विसंबून प्रवास केला, तर काळ ओढवतो, हे पुण्यातील तिघांच्या उदाहरणावरून दिसते.
सतीश सुरेश घुले (वय 34), गुरुसत्य राजेश्वर राक्षेकर (वय 42), समीर अतुलकर (वय 44 सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हे एम .एच.14 के. वाय. 4079 या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री निघाले होते. मोबाईलवर दिसणार्या मॅपप्रमाणे ते प्रवास करू लागले. त्यांना कळसूबाई शिखरावर जायचे होते. मॅपने त्यांना कोतूळवरून राजूर मार्ग दाखवायला हवा होता. तो जवळचा आणि सुरक्षित होता; परंतु ते कोतूळहून अकोल्याकडे निघाले. या मार्गादरम्यान मुळा नदीवरील जुना पूल लागला. पिंपळगाव खांड धरण भरल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे. चालकाला वाटले, पुलावर थोडेच पाणी असेल; परंतु पुढे गेल्यावर त्यांचे वाहन पुलावरून धरणाच्या पाण्यात पडले. ही वेळ रात्री पावणेदोनची होती. त्यामुळे काहीच कळत नव्हते. तिघेही वाहू लागले. त्यातील दोघांना पोहायला येत असल्याने ते बाहेर पडले. त्यांनी पाण्याच्या बाहेर येत आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारील वस्तीवरील लोक तेथे धावले. ते सतीश यांचा शोध घेऊ लागले. सकाळी आठ वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. सकाळी गावात निरोप जाताच चंद्रकांत घाटकर व काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घुले यांचा मृत्यू झाला होता. गाडीसह घुले यांचा मृतदेह बाहेर काढला. मोबाईलने चुकीचा मार्ग दाखवल्याने मृत्यूच्या मार्गाने जावे लागले. पिपरी चिंचवडमध्ये दुःखाचे वातावरण असून नातेवाइक कोतूळ येथे पोहचले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलाच्या जवळ धोक्याचा इशारा देणारा तसेच पुलावर जास्त पाणी असल्याचा कोणताही फलक लावलेला नाही. रात्री-बेरात्री या रस्त्याने येणार्यांना कुणाकडे विचारावे, असा प्रश्न पडतो. जलसंपदा विभागाच्या बेपर्वाईमुळेच हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.