सोनपेठ पोलिसांसह विशेष पथकाची कारवाई : पाच लाखाचा मुद्देमाल जप्त परभणी/प्रतिनिधी : कमी किंमतीत सोने देण्याच्या बहाण्याने खोटे सोने देत फसवण...
सोनपेठ पोलिसांसह विशेष पथकाची कारवाई : पाच लाखाचा मुद्देमाल जप्त
परभणी/प्रतिनिधी : कमी किंमतीत सोने देण्याच्या बहाण्याने खोटे सोने देत फसवणूक करणार्या तीन जणांना पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकासह सोनपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून रोख चार लाख 43 हजार रुपयांसह 73 हजार रुपयांचा चोरीतील मोबाईलही संयुक्त पथकाने जप्त केला.
तीन डिसेंबर रोजी सोनपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून माहूर येथील सागर राठोड यांच्यासह दोघांना सोनपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदवाडी शिवारात रात्री बोलून घेतले होते. रात्रीच्या सुमारास सांगितलेल्या ठिकाणी सोने घेण्यासाठी मोठी रक्कम सोबत आणलेल्या सागर राठोड यांच्यासह अन्य दोघांना मारहाण करीत त्यांच्याजवळील चार लाख 35 हजार रुपयांसह मोबाईल घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी सागर राठोड यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी हे त्या चोरट्यांच्या शोध घेत होते. त्याचदरम्यान हे सोनपेठ तालुक्यातील तांड्यावर असल्याची माहिती सोनपेठ पोलिसांसह पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकास मिळाली होती. सोनपेठ पोलिस व विशेष पथकाने संयुक्त कारवाई करीत मंगल भालू भोसले, रेखा नागनाथ पवार, दीपक बालू भोसले या तिघांना मोठ्या शिताफीने सोनपेठ तालुक्यातील एका तांड्यावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख 32 हजार रुपये रोख व 73 हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोनपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, कर्मचारी राठोड, भिसे, महिला पोलिस कर्मचारी काळे यांच्यासह विशेष पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, अरुण कांबळे, जमीरोद्दीन फारोकी, राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, विष्णू भिसे यानी ही कारवाई केली.