कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यालयांत जोरदार हाणामार्या आणि जाळपोळ झाली. ही हाणामारी कोणत्याही दोन वेगवेगळ्या ...
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यालयांत जोरदार हाणामार्या आणि जाळपोळ झाली. ही हाणामारी कोणत्याही दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांत झालेली नव्हती... तर भाजपच्याच जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांत ही हाणामारी झाली. या वेळी, या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोरच्या गाड्याही पेटवून दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांच्या सरकारमधील वनमंत्र्यानी राजीनामा दिला आहे.
भाजप पक्षात अगोदरपासून सक्रिय असणारे आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून नव्यानेच दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. यातील एक झडप आसनसोल स्थित भाजपच्या कार्यालयात झाली. यावेळी, इथे मंत्री बाबुल सिप्रियो आणि राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन हेदेखील उपस्थित होते. दुसरी झडप बर्दवान इथे झाली. जिल्हा अध्यक्ष संदीप नंदी यांना पदावरून हटवण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी केल्यानंतर हा वाद उफाळला. हा गदारोळ तर भररस्त्यात झाला. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. पक्ष कार्यालयाच्या बाहेरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या कार्यकर्त्यांनी एका टेम्पोला आणि अनेक बाईक पेटवून दिल्या. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर हे कार्यकर्ते पोलिसांनाही भिडले. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत, तर सात जणांना अटक करण्यात आली आहे. संदीप नंदी यांचा विरोध करणार्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही आमचा घाम गाळून पक्ष उभा केला; परंतु आता मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून पक्षात आलेल्या लोकांना महत्त्व दिले जाते आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याच भागात एक मोठा रोड शो केला होता. तसेच गेल्या महिन्यातच बर्दवान इथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पश्चिम बंगाल विधानसभेला अवघे तीन महिने उरले असताना पक्षातील मतभेद आणि संघर्ष भाजपच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. दरम्यान, बॅनर्जी यांच्या सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. वनमंत्र्याने थेट राज्यपालांकडेच राजीनामा सोपवला आहे. राजीव बॅनर्जी हे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता असून त्यांचा राजीनामा हा ममतंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. राजीव बॅनर्जी हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा ममतांकडे पाठवला. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. यावरून त्यांना ममता यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नसल्याचे स्पष्ट होते.