बीजिंग: मागील वर्षी जूनमध्ये लडाखमधील गलवान खोर्यात हिंसक चकमकीत ठार झालेल्या सैनिकांची संख्या लपवून ठेवणार्या चीनने आता सिक्कीममधील हा सं...
बीजिंग: मागील वर्षी जूनमध्ये लडाखमधील गलवान खोर्यात हिंसक चकमकीत ठार झालेल्या सैनिकांची संख्या लपवून ठेवणार्या चीनने आता सिक्कीममधील हा संघर्ष लपवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय लष्कराकडून चिनी सैनिकांसोबतच्या चकमकीला दुजोरा मिळाला असला, तरी चीनने अशा प्रकारची घटना नाकारली आहे. चिनी सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ’ग्लोबल टाईम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की सोमवारी भारतीय माध्यमांनी चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या संघर्षाचे वृत्त दिले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत; मात्र ग्लोबल टाइम्सच्या सूत्रांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या फ्रंट लाइन पेट्रोल लॉग्समध्ये याबाबतची कोणतीही नोंद नसल्याचे चीनच्या एका अधिकार्याने म्हटले. दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झडप होऊ शकते. जर अशा प्रकारची घटना झाली असेल आणि सैनिक जखमी झाले असतील, तर त्याची नोंद रेकॉर्डमध्ये केली जाते. चीनकडून एका बाजूला हे वृत्त फेटाळण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे भारतीय लष्कराने अशा प्रकारचा संघर्ष झाला असल्याचे म्हटले आहे. दोन्ही सैन्यांमध्ये एक किरकोळ संघर्ष झाला असून स्थानिक कमांडर अधिकार्यांच्या पातळीवर चर्चा करून हा वाद सोडवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चिनी सैन्याने सिक्कीममधील नाकू ला भागात घुसखोरी करत सीमा रेषेवरील सध्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चीनचे काही सैन्य भारतीय क्षेत्रात येत असल्याचे जवानांना दिसले. त्यानंतर भारतीय जवानांनी चिनी सैन्याला या भागातून हुसकावून लावले. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून या संघर्षात चार भारतीय जवान जखमी झाले असून 20 चिनी जवान जखमी झाले आहेत. सध्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे.