नाशिक येथे होऊ घातलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची निवड करण्य...
नाशिक येथे होऊ घातलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अद्यक्षांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभासदांतून निवड होत नाही. यापूर्वी इंदिरा संत यांच्यासारख्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेत अर्ज न मागविता सहभागी संस्थांनी सुचविलेल्या नावांतून एकमताने निवड केली जात असल्याने कटुता टळली आहे. या वर्षी साहित्य संमेलनाच्या स्थळावरून सुरुवातीला जो वाद झाला, तो कि
मान साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडीवरून तरी होणार नाही, ही अपेक्षा मात्र फलद्रुप झाली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाटी सुरुवातीला भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचे नाव गेली काही वर्षे सातत्याने आघाडीवर असते आणि ऐनवेळी ते मागे पडते, हा अनुभव वारंवार येत आहे. उस्मानाबाद येथे गेल्या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही त्यांचेच नाव आघाडीवर होते; परंतु फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे नाव अचानक पुढे आले आणि सासणे पुन्हा वेटिंग लिस्टमध्ये गेले. आताही नारळीकर यांचे नाव चर्चेला आल्यानंतर सासणे यांचे नाव मागे पडले. यातील दहा लोकांनी नारळीकरांच्या नावाचा आग्रह धरला तर काही लोकांनी सासणे हे गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असल्याने त्यांच्या नावाचा आग्रह धरला. शेवटी लेखकांची ज्येष्ठता व साहित्यमूल्य लक्षात घेऊन नारलीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रवींद्र शोभणे, तारा भवाळकर, ना. धों. महानोर, अनिल अवचट, रामचंद्र देखणे अशा विविध नावांची चर्चा सुरू झाली. यापैकी महानोर यांनी स्वत: नकार दिल्याने त्यांचे नाव आपोआप बाद झाले. आयोजन समितीने एक नाव देण्याची पद्धत आहे, त्यानुसार नाशिककच्या लोकहितवादी मंडळाने नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या मनोहर शहाणे यांचे नाव दिले होते. या नावाला नाशिकच्या साहित्यिकांनीदेखील प्रतिसाद दिला. शहाणेच संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, यासाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेऊन शहरातील साहित्य संस्थांनी निवेदन दिले. त्याचप्रमाणे एक नाव माजी संमेलनाध्यक्षांनी सुचविण्याचा रिवाज आहे. त्यानुसार दिब्रे्रटो यांनी भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नावाची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी, हा विज्ञान कथांचा सन्मान आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली काजळी नारळीकरांना मिळालेल्या अध्यक्षपदाच्या सन्मानामुळे दूर झाली आहे, अशा शब्दांमध्ये या निवडीचे समाजमानसातून स्वागत होत आहे. हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून जगविख्यात आहेत, त्याचबरोबर त्यांनी मराठी साहित्यात फार मोलाची भर घातली आहे. शिक्षित मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या हेतूने डॉ. नारळीकर यांनी लिखाण सुरू केले. विज्ञान कथांकडून विज्ञान कादंबरीपर्यंत त्यांचा साहित्य प्रवास झाला आहे. विज्ञान हे अतिशय गुंतागुंतीचे असते. त्याची परिभाषा सामान्यांच्या डोक्यावरून जाणारी असते. विज्ञान सोपे करून सांगणे हेच मोठे दिव्य असते. डॉ. नारळीकर यांनी हे दिव्य पार पाडले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम व्यवस्थित रचनेत अर्थपूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभारही सांभाळला होता. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नारळीकर नेहमी आग्रही राहिले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांच्या झालेल्या निवडीमुळे विज्ञानसाहित्याचा सन्मान झाला आहे तसेच अनेकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून घडामोडींकडे पाहण्यासाठीही चालना मिळेल. डॉ. नारळीकर यांना आधुनिक विज्ञानकथेचे जनक म्हटले जाते. गेल्या वेळी नाशिकला झालेल्या संमेलनाच्या आधी बोकडाचा बळी देण्यात आला होता. याच्या चर्चा त्यावेळी खूप गाजल्या. यंदा मात्र नारळीकर अध्यक्षपदी असल्याने अवकाशात रॉकेट सोडण्यात यावे, असा उपरोधिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी दिला. विज्ञाननिष्ठ वागणुकीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नारळीकर यांची निवड मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक महत्त्वाची अशी घटना आहे. ते केवळ जगन्मान्य वैज्ञानिकच नसून, वैज्ञानिक वृत्तीचा समाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी आपली व्याख्याने, चर्चा, परिषदा आदींमधून विज्ञानाचा अव्याहत प्रचार, प्रसार मराठीतून केला. त्याद्वारे मराठी भाषेच्या उपयोजनाचे हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केले आहे. आपल्या निवडीबद्ल डॉ. नारळीकर यांनी दिलेली प्रतिक्रिया संयत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात टिकून राहिली पाहिजे. त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती व्हावी, म्हणून नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. विज्ञान मराठीत आले की भाषा अधिक समृद्ध होईल. वैज्ञानिक आणि साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. देशात प्रथमच एका शास्त्रज्ञाला एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला असावा. आकाशाशी जडले नाते, व्हायरस, माझे विश्व, अंतराळ आणि विज्ञान, यक्षांची देणगी आदी साहित्यिक लिखाण प्रा. नारळीकर यांनी केले. वडील गणितत्ज्ञ, आई संस्कृत विदुषी अशा घरांत डॉ. नारळीकर वाढले. परदेशांत उच्च शिक्षण घेतल्यानंतरही ते भारतात परतले. खगोल आणि भौतिक विज्ञनाला त्यांनी वाहून घेतले. रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांना मिळाली. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 1988 मध्ये त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. आयुकाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी
क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्यांच्या ’यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपे करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो; ते कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारे व्यक्तिमत्व राहिले आहे. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या. आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ’चार नगरांतले माझे विश्व’ ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी ’विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ हे चरित्र लिहिले आहे. गेल्या चार साहित्य संमेलनातील वाद लक्षात घेतले, तर नाशिक त्याला अपवाद ठरावे, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. राजा तू चुकला आहे, हे सांगण्याचे धाडस दाखविल्यानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. विदर्भातील साहित्य संमेलनात उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करण्यात आले, तर उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रेटो यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या मिशनरीपणावरही टीका झाली. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर अतिशय संयमी असलेल्या डॉ. नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील साहित्य संमेलन तरी व्यवस्थित पार पडावे, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही.