लोहोणेर/प्रतिनिधी : - अपुरा पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग व औषधांचा तुटवडा यामुळे देवळा तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस धोक्यात आले असून आजारी अस...
लोहोणेर/प्रतिनिधी : - अपुरा पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग व औषधांचा तुटवडा यामुळे देवळा तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस धोक्यात आले असून आजारी असलेले पशुधन संख्या उपचारा अभावी घटत आली असल्याचे जाणवते आहे.सध्या देवळा तालुक्यातील ४९ गावात फक्त तीनच पशुसंवर्धन अधिकारी जनावरांवर होणाऱ्या उपचाराचा भार आपल्या खांद्यावर वाहत आहेत. देवळा तालुक्यातील श्रेणी १ मध्ये १ व श्रेणी २ मध्ये दोन असे एकूण तीन पशुसंवर्धन केंद्र तालुक्यात कार्यरत आहेत.
श्रेणी १ मध्ये देवळा, पिंपळगाव ( वा.),मेशी, दहिवड, उमराने, खर्डा, खांमखेडा येथिल पशु केंद्र समाविष्ट करण्यात आले आहेत. तर श्रेणी २ ) मध्ये लोहोणेर, महालपाटणे, भऊर येथील पशु दवाखाने कार्यरत आहेत. श्रेणी १ मध्ये एकूण सात व श्रेणी २ मध्ये ३ असे एकूण सात पशुसंवर्धन कार्यालय सुरू आहेत. यासाठी सात पशुधन विकास अधिकारी पदे मंजूर असले तरी प्रत्यक्षात १ च पशुधन अधिकारी आपल्या खांद्यावर भार वाहत आहे.तर सहा पदे रिक्त आहेत. तर पशु पर्यवेक्षक तीन जागांसाठी मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात दोनच पदे भरली आहेत तर एक पद रिक्त आहे. तसेच १७ परिचर पदे देवळा तालुक्यात मंजूर असून फक्त ८ कर्मचारी या पदांवर कार्यरत आहेत. यात प्रामुख्याने देवळा, खर्डे, पिंपळगाव, उमराने, दहिवड, खामखेडा, येथील केंद्रातील एकूण सहा पशुधन विकास अधिकारीपदे, तर भऊर येथील पशुधन पर्यवेक्षक १ पद रिक्त आहे. तसेच मेशी:- २, खामखेडा : - २, उमराने : - १,पिंपळगाव : - २, दहिवड : - १, देवळा : - १, अशी एकूण नऊ परिचर पदे सद्या रिक्त आहेत. देवळा तालुक्यातील जनतेचा शेती हा मुख्य व्यवसाय असून त्याला जोड धंदा म्हणून शेतकरी वर्गाकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन असून यात प्रामुख्याने बैल, गायी, म्हेस, आदींसह पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. आपले पाळीव जनावरे आजारी अथवा दुखापत ग्रस्त असलेली जनावरे उपचारा साठी डॉक्टरांची वाट पहात शेतकरी वर्ग इकडे - तिकडे घेऊन फिरत असल्याचे चित्र देवळा तालुक्यात सर्वत्र दिसत आहे. पाळीव व इतर जनावरावर जाणवत असलेला गोचीड किडीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी गोचीड पावडर शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. तर मोठ्या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांना वेळेवर कोणता उपचार मिळणार असा प्रश्न शेतकरी व पशुधन पाळणाऱ्याना सतावतो आहे. विशेष बाब म्हणजे जनावरावर उपचारासाठी खरेदी करावयाचे औषधे वर्षातून एकदाच एप्रिल मध्ये खरेदी केली जातात तरतीन टप्प्यात त्यांचे वाटप करण्यात येत असते. सद्या सर्वच पशुसंवर्धन केंद्रावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवत आहेत. मुळात अपुरा कर्मचारी वर्ग त्यात औषधांचा तुटवडा म्हणजे आई जेवू घालेना ! बाप भिक्षा मागू देईना !! अशी अवस्था पशू धन पाळणाऱ्याची झाली आहे. तालुक्यातील सर्वच पशुधन पाळणाऱ्यावर ही वेळ आली आहे. याकडे संबंधित अधिकारी व विभागाने तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.