अहमदनगर / प्रतिनिधीः चालू गळीत हंगामात देशभरात 482 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 11 कोटी 51 लाख टन उसाचे गाळप करून एक कोटी आठ लाख टन साखरेचे ...
अहमदनगर / प्रतिनिधीः चालू गळीत हंगामात देशभरात 482 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 11 कोटी 51 लाख टन उसाचे गाळप करून एक कोटी आठ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात एक जानेवारीपर्यंत चार कोटी वीस लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात 39 लाख 85 हजारर टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याला साखर उतार्यात मात्र अजूनही दहा टक्क्यांची सरासरी गाठता आलेली नाही.
31 डिसेंबर 2020 पर्यंत देशातील एकूण 482 साखर कारखान्यांमध्ये आतापर्यंत झालेले गाळप व साखर उत्पादन मागील वर्षीच्या हंगामाच्या सुरवातीस झालेल्या उत्पादनापेक्षा अधिक आहे. मागील वर्षी डिसेंबर 2019 अखेर देशात 439 साखर कारखाने गाळप करीत होते. कारखान्यांनी सात कोटी ऐंशी लाख टन उसाचे गाळप करून 78 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. त्या तुलनेने यंदा एक जानेवारीपर्यंत 30 लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. या वर्षी महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. मागील वर्षी राज्यात एक कोटी 65 लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा आतापर्यंत चार कोटी 20 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपाचे प्रमाण अडीच पटीने जास्त आहे. असे असले तरी यंदा राज्याचा साखर उतारा 9.50 टक्केच आहे. उत्तर प्रदेशात उसाचे गाळप तीन कोटी 31 लाख टन इतके झाले आहे आणि 9.95 टक्के सरासरी साखर उतार्याने साखरेचे 33 लाख टन उत्पादन झाले आहे. कर्नाटक राज्यातील 65 कारखान्यांनी दोन कोटी 61 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून सरासरी 8.95 टक्के उतार्याने 23 लाख 40 हजार टन साखर उत्पादित झाली आहे. त्या पाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश आदी राज्यांचा क्रमांक आहे. देशातील साखर कारखान्यांनी बदलत्या सरकारी धोरणाची दिशा लक्षात घेऊन साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. केंद्र सरकारने ठेवलेल्या 60 लाख टन निर्यातीच्या उद्दीष्ठास अनुसरून साखर निर्यातीवर भर द्यावा. जेणेकरून शिल्लक साखर साठे, त्यामध्ये अडकलेले पैसे व सातत्याने वाढणारे व्याज या ओझ्यातून कारखान्यांची सुटका होण्यास मदत मिळेल. 2022 नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार साखर निर्यात योजना बंद होणार आहे, याचा विचार साखर कारखान्यांना करावा लागणार आहे. कोल्हापूर विभागातील 37 कारखान्यांनी 96.81 लाख टन केले असून, 10.67 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पुणे विभागातील 30 कारखान्यांनी 93.59 लाख टन उसाचे गाळप करून 9.26 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.