जगात लोकशाही पद्धत ही लोकांच्या हितासाठी सर्वांत चांगली असते; परंतु लोकशाही मूल्यांना सध्या पायदळी तुडवायची घाईच सर्वांना झाली आहे. नागरिकां...
जगात लोकशाही पद्धत ही लोकांच्या हितासाठी सर्वांत चांगली असते; परंतु लोकशाही मूल्यांना सध्या पायदळी तुडवायची घाईच सर्वांना झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आणि हक्कांपासून त्यांना वंचित ठेवून एकाधिकारशाहीकडं लोकशाही व्यवस्थेची वाटचाल चालू झाली आहे. लोकशाहीच्या मंदिरात जनता आपल्याला बसवू इच्छित नसली, तर जनतेचा अनादर करून, मंदिराचं पावित्र्य घालवून तिथं बस्तान बसविण्याचा काहींचा प्रयत्न असतो. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची काहींची तयारी असते. डोनाल्ड ट्रम्प हे त्यापैकी एक.
एकदा सत्ता मिळाली, की मिळालेली सत्ता कुणालाही सोडवत नाही. खुर्चीचा मोह सर्वाना असतो. खुर्ची सोडायला सहसा कुणी तयार होत नसतं. खुर्चीचं माहात्म्य मोठं आहे. एकदा का खुर्चीला चिकटलं, की जणू फेव्हिकॉल लावल्यासारखं चिकटून बसायचं, अशी काहींची वृत्ती असते. लोकशाही राज्यपद्धतीत तर एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाला जनता सत्ता सोपवित असते. जनतेचा विश्वास असतो, तोपर्यंत सत्तेच्या खुर्चीवर बसायचं असतं. जनतेचा विश्वास गमावला, की ती खुर्ची सन्मानानं खाली करायची असते; परंतु काहींना जनतेचा हा कौलही मान्य नसतो. मग ते कुठल्याही थराला जायला तयार होतात. चीन, रशिया आणि अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यपद्धती असल्या, तरी त्यातील समान दुवा एकच आहे, तो म्हणजे सत्तेला चिकटून राहणं. त्यासाठी कोणत्याही थराला जाणं आलेच. व्लादिमीर पुतीन यांनी तर कोरोनाच्या काळात सर्वेक्षण करून सर्व सत्ताधीश होण्याचा आणि त्याचबरोबर माजी अध्यक्षांना कोणत्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, याचा बंदोबस्त केला. अमेरिकेत लोकशाही असली, तरी तिच्या मूल्यांना कसं पायदळी तुडवायचं, याचा धडा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घालून दिला. विभाजनवाद रुजविला. निवडणुकीच्या अगोदरपासून पराभवाची चाहुल लागल्यानं न्यायव्यवस्थेत आपली माणसं घुसवून ठेवली. प्रत्यक्ष पराभव दिसायला लागल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी दंगली घडवून आणल्या. न्यायालयीन लढे दिले. त्यातही अपयश आल्यानं या महाशयांनी न्यायव्यवस्थेवर टीका करायला पुढं मागं पाहिलं नाही. तीन नोव्हेंबरला निवडणूक होऊन आठवड्यात निकाल लागले असले, तरी ते ही स्वीकारायची ट्रम्प यांची तयारी नव्हती. अमेरिकेतील संसदेत इलेक्टोरेल मतांची मोजणी हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अंतिम टप्पा असतो. इलेक्टोरेल मतांचा निकाल लागला, तर आपण व्हाईट हाऊस सोडू, असं सांगणारे ट्रम्प नंतर बदलले. नाही तरी ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा, त्यांचा बेभरवशाचा स्वभाव पाहता त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित धरता येत नाही; परंतु अमेरिकेन संसदेत इलेक्टोरेल मतांची मोजणीच होऊ नये, यासाठी त्यांनी संसदेच्या इमारतीत समर्थकांना धुडगूस घालायला लावला. हे काही अचानक घडलं नाही. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. मतमोजणी होऊ दिली नाही, तर आपल्याला अध्यक्षपदावर राहता येईल, असं त्यांना वाटत असावं; परंतु त्यांना अमेरिकेतील कायद्याची माहिती नसावी. ट्रम्प यांना मुदतीपूर्वी सत्तेबाहेर फेकणं सहजशक्य होतं; परंतु संयमी ज्यो बायडेन यांनी तसं केलं नाही. ट्रम्प यांच्या समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. संसदेची इमारत असलेल्या कॅपिटल हिलवर झालेल्या या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्यानं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प समर्थकांचा हा धुडगूस म्हणजे अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू झाली. वॉशिंग्टनला राजधानीचा दर्जा देण्यापूर्वी अमेरिकेन संसदेच्या काही सदस्यांनी फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कसह इतर राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 4 मार्च 1789 रोजी अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात झाली आणि अमेरिकन काँग्रेसची (संसद) स्थापना झाली. त्यानंतर 1790 पर्यंत न्यूयॉर्क हेच अमेरिकेच्या संसदेचं घर होतं. जेव्हा अमेरिका रेसिडेंस अॅक्ट मंजूर झाला, तेव्हा अमेरिकाला कायमस्वरुपी राजधानी मिळाली. त्यानंतर अमेरिकेची संसद न्यूयॉर्कवरून वॉशिंग्टनला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ‘कॅपिटल हिल’मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष प्रत्येक वर्षी त्यांचं ‘स्टेट ऑफ द युनियन’चं भाषण करतात. याच ठिकाणीच ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’चं चेंबर असून त्याची सदस्य संख्या 448 आहे. ‘कॅपिटल हिल बिल्डिंग’च्या ‘वेस्ट फ्रंट’वरही अमेरिकेचे अध्यक्ष दर चार वर्षानंतर 20 जानेवारी रोजी शपथ घेऊन आपला कार्यकाळ सुरू करतात. आता तिथं बायडेन शपथ घेणार आहेत. या इमारतीला 220 वर्षांचा इतिहास आहे. आतापर्यंत या इमारतीवर अनेकदा हल्ले झाले; परंतु सात तारखेचा हल्ला हा त्या सर्वांहून वेगळा आहे. लोकशाही व्यवस्थेला पुढं नेण्यची जबाबदारी असलेल्या अध्यक्षानंच आपल्या समर्थकांना तिच्यावर हल्ला करण्याची फूस द्यावी, हा लोकशाहीवरचाच हल्ला आहे. 1800 मध्ये ही इमारत बनविण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार वर्षात म्हणजे 1814 मध्ये या इमारतीला आग लावण्यात आली होती. 24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटिशांचं युद्ध सुरू होतं. त्या वेळी या इमारतीला आग लावण्यात आली होती. त्यामुळं 1815 मध्ये या इमारतीच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलं होतं. जॉर्ज बॉमफोर्ड आणि जोसेफ गार्डनर स्विफ्ट या दोन लष्करी अभियंत्यांनी या इमारतीच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं. त्यातच सिनेट आणि हाऊसचीही निर्मिती करण्यात आली होती. ट्रम्प यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून बायडेन नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत; परंतु ट्रम्प वारंवार थपडा बसूनही आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. बायडेन यांनी निवडणुकीत घोळ घालून विजय मिळविल्याचा ट्रम्प यांचा आरोप कायम आहे. विशेष म्हणजे तेव्हा ट्रम्प हेच अध्यक्ष होतं. सात तारखेला बायडेन यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. म्हणजे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होतं. या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून या सोहळ्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी संसद परिसरात घुसून धुडगूस घातला. काही आंदोलकांनी संसदेच्या उपाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळं पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 57 आंदोलकांना अटक केली असून आंदोलकांकडून बंदुका जप्त केल्या आहेत. कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्ल्यामुळं अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यामुळं जनतेतून टोकाच्या प्रतिक्रिया उमटत असून त्यामुळं डोनाल्ड समर्थक आणि बायडेन समर्थक असे दोन गट अमेरिकेत निर्माण झाले असून आगामी काळात अमेरिकेत यादवी युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच वॉशिंग्टन डीसीमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांची रॅली आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी दीड तास भाषण केलं होतं. या भाषणातून त्यांनी त्यांच्या समर्थकांना सतत चिथावलं होतं. शिवाय ट्रम्प हे वारंवार टी्वट करून त्यांच्या समर्थकांना चिथावत होतं. त्यानंतरच हा हल्ला झाला आहे. बायडेन यांनी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होतं. या निवडीच्या ठरावावर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदारही बोलणार होते; पण त्यांनी ऐनवेळी बोलण्यास नकार दिला. रिपब्लिकनच्या खासदारांनाही हा प्रकार आवडला नव्हता. संसद परिसरात हल्ला झाल्यानं ही निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, म्हणून रिपब्लिकन खासदारांनी ठरावावर भाषण केलं नाही. त्यामुळं एक प्रकारे बायडेन यांना फायदाच झाला. हल्ल्याची संस्कृती अमेरिकेत ट्रम्प यांनीच आणली. ट्रम्प हे स्वत:च्या प्रेमात आहेत. इमेज राखण्यासाठी आणि ईगो जपण्यासाठी ते काहीही करतात. असा नेता पूर्वी अमेरिकेत कधीही झाला नाही. ते लोकशाहीतील नेत्यासारखं वागत नाहीत. ते हुकूमशहांसारखंच वागतता. ते मार्केटर आहेत. सेल्स आणि मार्केटिंगचं त्यांच्याकडं स्किल आहे. हे स्किल राजकारणापेक्षा वेगळं आहे. ते बिझनेसमधून आलेले आहेत. त्यामुळं त्यांना मार्केटिंगची हौस असून हीच त्यांची खूबी आहे. म्हणूनच ते स्वत:चं मार्केटिंग करत असतात; पण अमेरिकेतील लोकांना ते मान्य नाही. शिवाय असा नेता परत नको, असंही रिपब्लिकनांना वाटतं. ट्रम्प यांच्यासाठी पराभव ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांना विजय हवा असतो. त्यांना पराभव मान्यच नसतो. स्वत:ची इमेज वाचवण्यासाठीच त्यांनी निवडणूक पद्धतीतही खुसपट काढली. त्यांनी स्वत:च्या ईगोसाठी हे सर्व घडवून आणलं. रिपब्लिकन पक्षाचं नावही खराब केलं. आजच्या हल्ल्यानं रिपब्लिकनपासून अमेरिकन दूर जाणार आहेत. त्यामुळं पक्षाची पुनर्बांधणी करणं हे रिपब्लिकनांसमोरचं आव्हान असेल. ते करताना त्यांना ट्रम्प यांना दूर ठेवावं लागेल. रिपब्लिकन ट्रम्प यांना नेता मानणार नाहीत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षातही दोन गटात यादवी निर्माण होईल, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.