नांदेड/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पाच बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पाचही मुलांचे कौतुक क...
नांदेड/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पाच बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पाचही मुलांचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या मुलांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.
यंदा देशभरातील 32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि. नांदेड) याला, नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित राहुल पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांची निवड झाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीत बुडणार्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ’महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ’भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत ठाकरे यांनी या मुलांचे कौतुक केलेआहे.