बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपचे सरकार सत्तेवर येऊन काही महिने झाले नाहीत, तोच त्यांच्यात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजप हा मोठ...
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपचे सरकार सत्तेवर येऊन काही महिने झाले नाहीत, तोच त्यांच्यात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजप हा मोठा पक्ष झाल्यानंतर त्याने संयुक्त जनता दलावर दबाव वाढविला आहे. नितीशकुमार यांना असा दबाव येण्याची शक्यता वाटत होती. त्यामुळेच तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला नकार दिला होता. अरुणाचल प्रदेशातील संयुक्त जनता दलाचे सहा आमदार आवश्यकता नसतानाही भाजपने फोडले. त्यामुळे संयुक्त जनता दलात प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पक्ष तेवढ्यावर थांबलेला नाही, तर नितीशकुमार सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. वास्तविक ब्रिटनमध्ये ही परंपरा आहे; परंतु शॅडो कॅबिनेट विरोधी पक्षाचे असते, याचा विसर भाजपला पडलेला दिसतो.
संयुक्त जनता दलात त्यामुळे नाराजी असून 17 आमदार राष्ट्रीय जनता दलात सहभागी व्हायला तयार असल्याचे सांगितले गेले; परंतु पक्षांतरविरोधी कायद्याची कारवाई होऊ नये, म्हणून अजून आठ आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय जनता दलाने या परिस्थितीचा अचूक फायदा उठवून संयुक्त जनता दलाच्या आमदारांच्या भावनांना हात घातला आहे. त्यामुळे संयुक्त जनता दलात नाराजी आहे. भारतीय जनता पक्षावर अन्य कुणी थेट आरोप केला नाही; परंतु माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी भाजपला इशारा दिला आहे. नीतीशकुमार यांना कमकुवत मानू नका, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही देताना त्यांनी भाजपवर टीका केली. अरुणाचलमध्ये जे घडले ते चांगले झाले नाही, असे ते म्हटले. अशा चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्या, असे त्यांनी भाजप नेतृत्वाला सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी संयुक्त जनता दलाचे 17 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा केला होता. या विधानावर आमचे प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान यांनी प्रत्युत्तर दिले, की लवकरच कोणाचे आमदार कोठे आहेत हे कळेल. रजक स्वत: राष्ट्रीय जनता दलात असतील का, हा खराप्रश्न आहे. राजक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रीय जनता दलात दाखल झाले.
राष्ट्रीय जनता दल बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्थिर करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अरुणाचल प्रदेशमधील संयुक्त जनता दलाच्या सहा आमदारांना फोडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाने अगोदरच संयुक्त जनता दलाला भारतीय जनता पक्षापासून बाजूला होऊन दोन्ही जनता दलाचे सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यात फक्त एक अट आहे, ती म्हणजे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याची. त्याला संयुक्त जनता दल सहजासहजी तयार होणार नाही. आता राष्ट्रीय जनता दलाने एक मोठे पोस्टर लावले आहे. पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रीय जनता दलाने नितीशकुमारांवर थेट हल्ला चढविला आहे. नितीशकुमार यांची मुख्यमंत्र्यांची खुर्ची भाजपचे नेते कापत आहे, असे हे फलक आहे. भाजप अध्यक्ष जे. छी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नितीशकुमार यांची खुर्ची कापताना दिसत आहेत. ते (नितीशकुमार) खुर्चीवर बसण्यास योग्य नसते म्हणून कट करा, असे भाजपचे एक नेते सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप नेत्यांचे कौतुक करताना या पोस्टरमध्ये दाखवले आहे. या पोस्टमध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि आता भाजपचे राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांच्यावरही टीका झाली आहे. या पोष्टरवरून संयुक्त जनता दल संतप्त झाले आहे. नितीशकुमार यांचे असहाय्य नेते म्हणून वर्णन केले असून सूड घेण्याची ताकद ते गमावून बसले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते शक्ती यादव म्हणतात यांनी या पोष्टरचे समर्थन केले आहे. सामाजिक कार्यकर्ते पोस्टर लावत असतील, तर त्यात काय चुकले, असा सवाल केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलातील तण़ाव एकीकडे वाढत असताना दुसरीकडे या पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी मात्र दोन्ही पक्षांतील संबंध अधिक दृढ होत असल्याचा चमत्कारिक दावा केला आहे. भाजपने ज्येष्ठ नेत्यांचे शॅडो कॅबिनेट तयार करून सरकारी योजनांवर देखरेख सुरू केली आहे. सरकारी योजनांचा आढावा घेण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करील. त्याला अधिकारही देण्यात आले आहेत. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर तीन नेत्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. सरकारच्या विविध विभागांच्या मंत्र्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या योजना व कामांची सखोल माहिती ठेवण्याचे काम पक्षाच्या पदाधिकार्यांना दिले आहे. सर्वात महत्त्वाची जबाबदारी सध्याचा शासकीय नियोजन विभाग, पंचायती राज निवडणूक विभाग आणि शेतकरी उत्पादक संघटनावर देण्यात आली आहे. राज्यातील एफपीओची जबाबदारी क्षेत्रनिहाय किंवा जिल्हानिहाय एफपीओ करण्याची जबाबदारी असेल. एफपीओ सरकारच्या कामकाजावर देखरेख ठेवतील. सरकारबरोबर समन्वय साधून यंत्रणा कार्यान्वित करुन तेथील त्रूटी दूर केल्या जातील. आगामी पंचायत निवडणुकांच्या दृष्टीने तिन्ही नेत्यांची जबाबदारी संघटनेत महत्त्वाची मानली जाते. शासनाच्या नियोजन विभागाची स्थापना करण्यात आली असून संतोष पाठक, कुणाल भारती आणि अभय कुमार यांची आढावा समिती नेमण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनीही तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात कार्यालयीन इमारत समिती, शिस्त समिती आणि प्रशिक्षण समिती आहे. बिहारच्या राजकारणात एक नवीन गोष्ट दिसून येत आहे. बडबडे लालूप्रसाद यादव शांत आहेत आणि युक्तीने काम करीत आहेत, तर शांत आणि शिस्तबद्ध असलेले नितीशकुमार बोलघेवडे झाले आहेत. त्याचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत. बिहारमध्ये सरकार कुणाचे असले आणि विरोधी पक्ष कोणताही असला, तरी नितीशकुमार आणि लालूप्रसाद या दोघांभोवतीच राजकारण फिरत असते. लालूप्रसाद यादव हे कायम टीकेचा आणि चेष्टेचा विषय ठरतात, तर नितीशकुमार शांत आणि शिस्तप्रिय आहेत. तुरूंगात असल्याने लालूंना आपले अभिव्यक्ती करण्याचे माध्यम बदलावे लागले; परंतु त्यांनी बोलणे सोडले नाही; पण या वेळी दोघांच्या भूमिका बदलत आहेत. लालू शांत आहेत आणि नितीश बोलत आहेत. संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी मोठे भाषण केले. राष्ट्रीय जनता दजल सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लालू कुटुंबाशी संबंधित सूत्रांचे मत आहे, की संपूर्ण घटनेचा फायदा दोन प्रकारे घेण्याचा राष्ट्रीय जनता दल प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलात अंतर वाढविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. त्याला भाजप आपल्या कृतीतून संधी देत आहे. सत्तेचे केंद्र बदलले, तर संघटनेस बळ मिळेल, असे राष्ट्रीय जनता दलाला वाटते. त्यामुळे तर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचे नितीशकुमार यांच्यावरचे प्रेम अचानक वाढू लागले आहे. रजक यांच्या संयुक्त जनता दलातील 17 आमदारांच्या विधानांबाबत त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांची कानउघाडणी केली.