पुणे/प्रतिनिधीः पुण्यातील सुप्रसिद्ध सोने-चांदी विक्रीचे व्यावसायिक पी.एन. गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांना तब्बल एक कोटी 60 लाख 50 हजा...
पुणे/प्रतिनिधीः पुण्यातील सुप्रसिद्ध सोने-चांदी विक्रीचे व्यावसायिक पी.एन. गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांना तब्बल एक कोटी 60 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदीगडमध्ये व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु.ना.गाडगीळ यांना एक कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून रोहितकुमार शर्मा (वय 59) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंदीगड येथे उघडण्यासाठी 50 कोटीचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवत रोहितकुमार शर्मा याने गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून कर्ज वितरणासाठी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून फिर्यादीकडून एक कोटी 60 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम घेतली होती. दरम्यान, या प्रक्रियेला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाडगीळ यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. गाडगीळ यांच्या तक्रारीवरून आरोपी रोहितकुमार शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलिस करीत आहे.