संकटाच्या काळात धीरानं वागायचं असतं. संयम सोडायचा नसतो. संयम सोडला, की कधीकधी नको ती वक्तव्यं तोंडून बाहेर पडतात. नेत्यांनी तर अतिशय जबाबदार...
संकटाच्या काळात धीरानं वागायचं असतं. संयम सोडायचा नसतो. संयम सोडला, की कधीकधी नको ती वक्तव्यं तोंडून बाहेर पडतात. नेत्यांनी तर अतिशय जबाबदारीनं वागायचं असतं; परंतु नेतेच बेजबाबदार वागतात. आपल्याकडच्या नेत्यांना कुठंही राजकारण दिसतं. तोेंडाला येईल ती व्यर्थ बडबड केली जात असते. त्यातून संभ्रम वाढत जातो.
कोणत्याही गोष्टीत घा़ई करून चालत नसते. वेगावर जसं नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं, तसंच ते बोलण्यावर ही ठेवावं लागतं; परंतु काहींच्या जिभेला हाडच नसतं, असं म्हणण्याची आपल्याकडं पद्धत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी अति घाई संकटात नेई, असे फलक लावलेले दिसतात. रस्त्यावर चालताना अति घाई जशी उपयोगाची नसते, तशी ती जीवनातही नसते. सर्वंच ठिकाणी घाई ही अपघाताला निमंत्रण देणारी असते. ती संकटात टाकत असते. पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला लागलेल्या आगीचा निष्कर्ष काढण्यात जी घाई झाली, त्यामुळं संभ्रम निर्माण झाला. लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेला 15 दिवस होत नाही, तोच पुण्याच्या ’सीरम इन्स्टिट्यूट’ला आग लागली. भंडार्याच्या दुर्घटनेत दहा नवजात अर्भकांचा बळी गेला, तर ’सीरम’ला लागलेल्या आगीत पाच कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ’सीरम इन्स्टिट्यूट’ला लागलेल्या आगीत बरंच साम्य आहे. दोन्ही ठिकाणी निष्काळजीपणा नडला. दोन्ही ठिकाणी दुर्बळांचेच बळी गेले. दोन्ही ठिकाणी आगीची कारणं सांगण्याची घाई झाली. पुण्याची ’सीरम’ कोरोना लसीच्या निर्मितीमुळं जगभर चर्चेत आली असली, तरी ती फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जगात सर्वाधिक लसींचं उत्पादन करण्यात या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा संस्थेच्या नव्या इमारतीला आग लागल्यानं या घटनेची माहिती जाणून घेण्याची नागरिकांची उत्सुकता ताणली जाणं स्वाभावीक आहे. अशा वेळी तर जास्त संयमानं माहिती द्यायला हवी. राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असताना कोणतीही घाई न करता माहिती समजायला हवी. तसं केलं नाही, तर गैरसमज अधिक पसरण्याचा, तपास यंत्रणांची दिशाभूल होण्याचा धोका असतो. या संस्थेचे प्रमुख आदर पुनावाला, आमदार मुक्ता टिळक आणि वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जी घाई केली, ती संभ्रम निर्माण करणारी होती. पुनावाला यांनी आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, असं सांगण्याची घाई केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन-अडीच तासांतच पाच जणांचा मृत्यू झाल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले. जी माहिती महापौरांना मिळते, ती माहिती आदर पुनावाला यांना का मिळू नये, असा प्रश्न उपस्थित होतो. आग आटोक्यात आल्यानंतर पाचव्या मजल्यावर शोध घेतला, तेव्हा पाच मृतदेह आढळले.
या आगीनंतरही कोरोना लस सुरक्षित आहे, असे वारंवार सांगितलं जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुरुवातीला कोरोना लस असलेल्या इमारतीला आग लागल्याची माहिती देण्यात आली होती. अशी चुकीची माहिती कशी दिली गेली, हा संशोधनाचा मुद्दा आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांनी ही कोरोना लस उत्पादित होत असलेल्या भागाला आग लागली असून त्यात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं सांगायला त्या विसरल्या नाहीत. अशा कठीण प्रसंगात वैयक्तिक मतं नसतात. अॅड. आंबेडकर यांनीही आग लागली, की लावली, असा प्रश्न उपस्थित करून आणखी गोंधळ वाढविला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना अशा नेत्यांपुढं हात जोडून संशयाची लस टोचण्याची घाई झाल्याचं मत व्यक्त केलं. जबाबदार व्यक्तींचं बेजबाबदार बोलणं तपास यंत्रणांचाही कसा गोंधळ करतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर माध्यमांनीही लगेच आगीच्या घातपाताचा शोध तपास यंत्रणांनी सुरू केल्याचं जाहीर करायला सुरुवात केली. ’सीरम’च्या ज्या इमारतीला आग लागली, त्या इमारतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी भेट दिली होती. बीसीजी लसीचं उत्पादन इथं होतं. ही इमारत नवीन आहे. आगीत या इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांचं नुकसान झालं. संपूर्ण आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती; पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. या इमारतीत अजूनही काम सुरू होतं. तिथं वेल्डिंगचे काम चालू होतं. त्याच्या जवळच ज्वलनशील पदार्थ होते. ज्या ठिकाणी वेल्डिंग सुरू आहे, तिथले ज्वलनशील पदार्थ अन्यत्र हलवायला हवे होते; परंतु तसं न केल्यामुळं ही मोठी दुर्घटना घडली, असा प्राथमिक अंदाज आहे. वेल्डिंगच्या ठिणग्यामुळं ही आग लागली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर बांधकाम सुरू होतं. आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही, असं दुसरीकडं सांगण्यात आलं. नेमका विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न त्यामुळं उपस्थित झाला. आग आटोक्यात आल्यानंतर जेव्हा शेवटच्या मजल्याची पाहणी करण्यात आली, तेव्हा पाच मृतदेह आढळून आले. मृत्युमुखी पडलेले हे इमारतीच्या बांधकामासाठी आलेले मजूर होते. इतर सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मृतांच्या नातेवाइकांना ’सीरम’च्या व्यवस्थापनाकडून 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना झाली, की मदत दिली जाते. या मदतीमुळं गेलेली माणसं परत येत नसतात. आता सरकारी मदतही जाहीर होईल. आगीत होरपळलेले जीव हे कंत्राटी कामगार होते. त्यांच्या कामावर घर चालायचं. आता मिळणार्या मदतीतून त्यांची तात्पुरती गरज भागू शकेल; परंतु अशा घटनांत ज्या घरातील मजूर जातात, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला रोजगार दिला, तरच त्यांच्या दुखाचा भार काहीसा हलका होईल.
कुठंही आग लागली, की फायर ऑडिटचा मुद्दा उपस्थित होतो. त्याची चर्चा होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच सर्व संस्थांना अग्निसुरक्षेच्या उपकरणांचा आढावा घेणं तसंच त्यांची वारंवार देखभाल करणं कसं आवश्यक आहे, हे राजकोट आणि अहमदाबाद येथील कोरोना रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या वेळी स्पष्ट केलं. आता फायर ऑडिट करणारं पथक ’सीरम’मध्ये दाखल होईल. कंपनीनं योग्य खबरदारी घेतली होती का, याचं आता ऑडिट केलं जाईल. तसंच या भागात पोलिस सुरक्षा कायम ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या आगीचा ’कोव्हिशिल्ड’ लसीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. ’सीरम’मधल्या सुरक्षेवर आता लगेचच भाष्य करणं योग्य होणार नाही, असा सावध पवित्रा जसा मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसा तो टिळक-आंबेडकरांना घेता ़आला नाही. घातपाताची माहिती विरोधकांकडे नेमकी कशी येते, हे गुपीत आहे. सर्जिकल स्ट्राईक किंवा इतर गोष्टींची त्यांना आधीच माहिती कशी मिळते? त्यांचं ज्ञान अगाध आहे. त्यांना काहीतरी विद्या वगैरे प्राप्त आहे. त्यांच्याकडं माहिती असेल तर त्यांनी ती जरूर द्यावी; पण त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असा टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. ’सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या प्लँटला लागलेल्या आगीचं वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली आणि तातडीनं कृती करण्याच्या सूचना दिल्या. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्याची घाई केली. आग लागलेली एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये लस तयार होण्याचं काम होत नव्हतं. लस तयार होणारी इमारत वेगळी आहे. पुण्यातल्या सीरमच्या इमारतीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना सायरस पुनावाला यांनी मदत जाहीर केली आहे. पाचही मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याची घोषणा पुनावालांनी केली आहे. आम्हाला अतिशय दुःख झालं आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच; मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास 25 लाखांची मदत देत आहोत, असे पुनावाला यांनी जाहीर केलं आहे. व्हॉटस् अॅप मेसेज आणि सोशल मीडियातील बातम्यांवरून नेते निष्कर्ष काढायला लागले, तर पदरी फजितीशिवाय काही पडत नाही.