मायणी / वार्ताहर : खटाव तालुक्यातील तरसवाडी (ता. खटाव) येथील घाट माथ्यावर वणवा लागून तेथील शेकडो एकरांवरील वनराई आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...
मायणी / वार्ताहर : खटाव तालुक्यातील तरसवाडी (ता. खटाव) येथील घाट माथ्यावर वणवा लागून तेथील शेकडो एकरांवरील वनराई आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वनविभागाच्या निष्काळजीपणा व मनमानी कारभारामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
खटाव-माण-आटपाडी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या खटाव तालुक्यातील तरसवाडीच्या पश्चिमेला डोंगररांगा आहेत. सुमारे दोन किलोमीटरचा चढणी व उतरणीचा तरसवाडी घाट आहे. तेथील घाटमाथ्यावर लोकांच्या खासगी मालकीच्या जमिनी आणि वन क्षेत्रही आहे. घाटमाथ्यावर व परिसरात गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झाल्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण केले आहे. या परिसरात पर्जन्यमान कमी असल्यामुळे, ओसाड व उजाड असलेल्या घाटमाथ्यावर वनराई फुलवण्याचे काम खटाव तालुक्यातील तरसवाडी, मुळीकवाडी व पाचवडच्या नागरिकांनी केले आहे. वनांचे रक्षण व संवर्धन करण्याचे ज्यांचे काम वनविभागाचे असूनही घाटमाथ्यावरील वनराईच्या संवर्धनाकडे नियमितपणे दुर्लक्ष होत आहे.
खटाव-माण तालुक्यांच्या सीमेवरील कुक्कुडवाड खिंडीपासून ते तरसवाडी (जळकी) दरम्यान दहा किलोमीटर लांबीच्या डोंगर माथ्यावर दर वर्षी मानवनिर्मित वणवा लागतो. कधी तिथे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांद्वारे निर्माण झालेल्या विजेच्या ठिणग्या पडून, तर कधी अज्ञात व्यक्तींकडून परिसरातील गवताला आग लावली जाते. खबरदारीची उपाययोजना म्हणून वनक्षेत्रात जाळ रेषा काढण्याचे काम वनविभाग करत नाही. काढल्याच तर त्याही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक कामे निव्वळ कागदोपत्री केली जातात. मात्र, प्रत्यक्ष काम केले जात नाही.
नुकताच लागलेला वणवा स्थानिक लोक व वन विभागाचे कर्मचार्यांच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यास यश आले. या आगीत शेकडो झाडेझुडपे आगीने होरपळून गेली आहेत. परिसरातील शेतकर्यांनी जनावरांच्या चार्यासाठी कापून ठेवलेले गवत जळून गेले आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोणाच्या या घटनेची चौकशी करून वरिष्ठ अधिकार्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. लेखी निवेदन देऊनही वन विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असे तरसवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.