कराडसह ठिकठिकाणच्या 81 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत द...
कराडसह ठिकठिकाणच्या 81 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड
विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तर प्रदेश येथील एकाने कराडसह सातारा, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील 81 लोकांची सुमारे 13 कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. हृदया रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, रूम नं. 1109, 10 वा माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुप्ता हा प्रॉफिट मार्ट, पुणे येथे शेअर मार्केटमध्ये नोकरीस होता. शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत ह्दया गुप्ता याने कराड येथील अमित आंबेकर व त्याचे मित्र सचिन वाघमारे यांचेकडून 19 लाख 87 हजार 500 रूपये वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेऊन पळून गेला होता. त्यास कराड पोलिसांनी 27 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा उत्तरप्रदेश येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता गुप्ता याने सातारा, अहमदनगर, बीड व पुणे जिल्ह्यातील लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये बीड येथील एसटी चालक त्यांनी कर्ज काढून पैसे गुंतवले होते. तर पुणे येथील एकाने वडिलांचे निवृत्ती नंतरचे फंडाचे पैसे गुंतवले होते.
गुप्ता याने 81 लोकांची सुमारे 13 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुप्ता याने शेअर मार्केटमध्ये नोकरी करत असताना त्याची कंपनीत गुंतवणूक करणार्या वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन गुप्ता याने कंपनीपेक्षा जास्त फायदा व हमखास प्रति महिना उत्पन्न असे आमिष लोकांना दाखविले. त्याबाबत कागदोपत्री करार करून हमी दिली. सुरूवातीला विश्वास संपादन करणसाठी 5 ते 6 महिने प्रति महिना परतावा दिला. लोकांचा विश्वास संपादन झाल्याचे समजताच गुप्ता याने मोठ्या रक्कमेची मागणी करून ती प्राप्त करून सर्व रक्कम घेऊन पोबारा केला. गुप्ता याने या पैशातून बी.एम.डब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या, फाईव्हस्टार हॉटेलमधील राहणे, परदेश दौरे, विमान प्रवास, महागडे कपडे, घड्याळे अशा प्रकारे लोकांचा मिळवलेला पैसे त्याने खर्च केला.
या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.