इस्लामपूर / प्रतिनिधी : साधारणतः 15 गुंठ्यात 12 ते 14 मेट्रीक टन ऊसाचे उत्पन्न निघणार्या त्याच क्षेत्रात योग्य नियोजन, संतुलीत खत व्यवस्थ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : साधारणतः 15 गुंठ्यात 12 ते 14 मेट्रीक टन ऊसाचे उत्पन्न निघणार्या त्याच क्षेत्रात योग्य नियोजन, संतुलीत खत व्यवस्थापन व वेळेला महत्व देत येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील जगताप बंधूनी नुकतेच 44 मेट्रीक टनाचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या ऊसाला 52 ते 54 कांड्या होत्या.
दत्तात्रय जगताप व हर्षद जगताप या बंधूनी आपआपले व्यवसाय सांभाळीत यावर्षी शेतीकडे लक्ष दिले. मार्चमध्ये शेताची पहिली नांगरट केली. त्यानंतर शेणखत घालून दुसरी नांगरट केली. मे अखेर शेताची मशागत करुन जूनच्या पहिल्या आठवड्यात को. 86027 या ऊस जातीची लावण केली. ही लावण औषधाच्या द्रावणात बुडवून केली. गावातीलच रोहीत पाटील व राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व सल्ल्यानुसार ऊसपिकाचे व्यवस्थापन केले. वेळचे वेळी लागवड, पाणी व औषध फवारणी केली. पिकाची वाढ ही जोमदार झाल्याने ऊस तोडणीवेळी ऊसाला 52 ते 54 कांड्या होत्या. या क्षेत्रात पहिल्यांदाच एवढा ऊस निघाल्याने जगताप बंधू आनंदीत झाले आहेत.
आम्हाला जमीन क्षेत्र कमी असल्याने मी व माझा लहान बंधू दोघेही व्यवसाय करतो. यावर्षी दोघांनीही शेतीत लक्ष घालून कष्ट केले. प्रामाणिक कष्टाचे चीज झाल्याने समाधान वाटल्याचे दत्तात्रय जगताप (रा. येडेमच्छिंद्र) यांनी सांगितले.