इस्लामपूर / प्रतिनिधी : वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या 30-35 वर्षातील महत्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहीमद्व...
इस्लामपूर / प्रतिनिधी : वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या 30-35 वर्षातील महत्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहीमद्वारे आम्ही सोडवू शकलो. याचे मोठे समाधान आम्हा सर्वांना आहे. माझ्या जलसंधारण खात्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण आहे. ते 10 किंवा 15 टक्के करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच करून घेवू, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथे माणकेश्वर हॉलमध्ये सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ती व फल निष्पती मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आ. मानसिंग नाईक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, प्रतिकदादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील 29 वसाहतीमधील प्रकल्पग्रस्तांना जमीन, भूखंड तसेच नागरी सुविधेच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
ना. पाटील म्हणाले, धरणाच्या उभारणीसाठी मोठा त्याग केला. मात्र, आपणास मोर्चे, आंदोलने करण्यात आपल्या दोन पिढ्या गेल्या. त्यामुळेच मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने आपले प्रश्न सोडविणारी मोहीम हाती घेतली. पुढच्या 10-20 वर्षात सुटले नसते, ते साधारण 70-80 टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत. कोविडमुळे काही काळ गेला आहे. सध्या जनगणना सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण झाल्यानंतर आपले स्वतंत्र ग्रामपंचायतचे प्रस्ताव मार्गी लावू. ज्या प्रकल्पग्रस्तांना क्षारपड जमीन आली आहे. त्या जमिनीतून जलसंधारण खात्याच्या वतीने पाण्याचा निचरा करून दिला जाईल. आपले सर्व प्रश्न संपले असा आमचा दावा नाही. जे काही थोडे प्रश्न राहिले असतील, तेही मार्गी लावू.
आ. मानसिंग नाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला गती देणार्या चांदोली धरण उभारणीतून आपण गेल्या 35 वर्षांपूर्वी विस्थापित झाला आहात. आपण आपले घर, जमीन व सर्वस्वाचा त्याग केला आहे. खरेतर आपले प्रश्न तातडीने सुटायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. ना. जयंत पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतल्याने आपले इतक्या वर्षाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आपल्या चेहर्यावर समाधानाच्या छटा उमटल्या आहेत. आता शेवटच्या माणसाचे काम पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही.
(पान 1 वरुन) जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले, आम्ही ना. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी 2-3 महिने विशेष मोहीम राबविली. संबंधित सर्व खात्याच्या अधिकारी जिल्ह्यातील 29 वसाहतींना भेटी देवून त्यांचे प्रश्न समजून घेवून मार्गी लावले आहेत. यावेळी त्यांनी या मोहिमेत केलेल्या कामांची आकडेवारी मांडली. यावेळी धरणग्रस्तांचे प्रतिनिधी नामदेव नांगरे फाळकेवाडी, धावजी अनुसे नेर्ले यांनी ना. जयंत पाटील व संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी जे 40 वर्षात झाले नाही ते करून दाखविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून काही प्रश्नांची मांडणी केली.
प्रारंभी वाळवा तहसिलदार रविंद्र सबनीस यांनी स्वागत तर अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरवदे (आष्टा) यांनी धरणग्रस्त बांधवांच्यावर लिहिलेले गीत आदर्श विद्या मंदीरच्या विद्यार्थिनींनी सादर केले.
यावेळी कोल्हापूर पाटबंधारे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, उपवन संरक्षक प्रमोद धानके, कृष्णा खोरे विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, जिल्हा भूसंपादन अधिकारी किशोर जाधव, वनाधिकारी महादेव मोहिते, सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, संजय पाटील, नगरसेवक संजय कोरे, विजयबापू पाटील, देवराज पाटील, संभाजी कचरे, भरत देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी किसन मलप, शंकर सावंत यांच्यासह वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यातील वारणा धरणग्रस्त, अभयारण्य प्रकल्पग्रस्त तसेच संबंधित सर्व खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आभार मानले.