महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावाला बुक्टोचा विरोध मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्या...
महाविद्यालये सुरू करण्याच्या
प्रस्तावाला बुक्टोचा विरोध
मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. राज्य शासनाच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते; परंतु मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली आहे. या निर्णयाला मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने विरोध केला आहे. बुक्टोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले आहे. परिपत्रकात मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या कॉलेज, संस्था सुरू करताना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी विचारविनामय करून कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. सोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्या मार्गदर्शक सूचना कॉलेज सुरू करण्याबाबत दिल्या आहेत, त्याचे पालन करून तो अहवाल स्थानिक प्रशासनाला कळवावा, अस या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे हे परिपत्रक शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असून मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या प्रत्येक 780 कॉलेजला स्थानिक प्रशासनाकडून परवानग्या घ्याव्या लागणार का, असा प्रश्न बुक्टोने विचारला आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या कोरोना चाचण्या करण्याबाबत विद्यापीठाने स्थानिक जिल्हाधिकर्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले असताना मुंबई विद्यापीठ व त्या अंतर्गत येणारे कॉलेज यामध्ये शिकवणार्या, काम करणार्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या कोरोना चाचणीचे काय, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला आहे.