कल्याण/प्रतिनिधी: ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्...
कल्याण/प्रतिनिधी: ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाइन फ्रॉड उघडकीस आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी ही माहिती दिली.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारी एक तरुणी नवी मुंबई येथील ए
का खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. 2017 मध्ये या तरुणीने जीवन साथी डॉट कॉम वर लग्नासाठी नोंदणी केली. तब्बल तीन वर्षानंतर 2020 नोव्हेंबर मध्ये प्रकाश शर्मा नावाच्या एका तरुणाने या तरुणीला संपर्क साधला. तो ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर आहे. शर्मा याने त्या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली. जानेवारीमध्ये प्रकाश हा भारतात येणार आहे, असे त्याने त्या तरुणीला सांगितले. 23 जानेवारी रोजी प्रकाश याने फोन करून सांगितले, की तो दिल्ली विमानतळावर आला आहे; मात्र त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला सीमाशुल्क अधिकार्यांनी पकडले आहे. पैसे भरावे लागतील, आधी त्याने 65 हजार रुपयांची मागणी केली. संबंधित तरुणीने नेट बँकिंगद्वारे प्रकाशला पैसे दिले. त्यानंतर 24 ,25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून प्रकाश शर्मा याने तिच्याकडून जवळपास 16 लाख 50 हजार रुपये घेतले आणि नंतर तो अचानक गायब झाला.
आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्या तरुणीने कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी या प्रकरणात तपास सुरू केला. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार असल्याने पोलिस तपास करीत आहे; मात्र एका उच्च पदावर असलेल्या तरुणीला सोळा लाखाचा गंडा घातला गेल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर म्हणवणारी प्रकाश शर्मा ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका घेतली जात आहे. फक्त नाव बदलून त्या तरुणीची फसवणूक करण्यात आली असण्याची शक्यता आहे.