नवी दिल्ली : राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशीही कृषी कायद्यावरून गदारोळ झाला. आम आदमी पार्टीच्या खासदारांना सभापतींच्या बाकासमोर जाऊन घोषणाबाजी क...
नवी दिल्ली : राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशीही कृषी कायद्यावरून गदारोळ झाला. आम आदमी पार्टीच्या खासदारांना सभापतींच्या बाकासमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने 'आप'चे 3 खासदार निलंबित करण्यात आले. आपचे खासदार संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एन डी गुप्ता यांनी सदनात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
यावेळी सभापती व्यंकय्या नायडूंनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले. परंतु, खासदारांनी घोषणाबाजी कायम ठेवल्यामुळे सभापतींनी मार्शल्सना पाचारण केले. या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मंगळवारी राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे आता बुधवारच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर बुधवारीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गदारोळ झाला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी बुधवारीही स्थगन प्रस्ताव आणि शून्य प्रहराची मागणी करणारी नोटीस दिली. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, राजीव सातव, डिएमके खासदार तिरुची शिवा, तसेच बसप, भाकप, माकप आणि तृणमूलच्या खासदारांनीही स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.