पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या चार किलोमीटरच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च...
पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या चार किलोमीटरच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय या सुशोभीकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूककोंडीत भरच पडली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू आहे, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
पुण्यातील फग्ुर्यसन महाविद्यालय तसेच जंगली महाराज रस्त्याच्याकडेला लोकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आकर्षक कमानी, रंगीबेरंगी खांब आणि पुरेशी सावली यामुळे अनेक जण या ठिकाणी तासन् तास बसलेले पाहायला मिळतात; मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्यात येणार्या या सुशोभीकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी मात्र कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे रस्ता वाहनांसाठी आहे की लोकांना बसण्यासाठी असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. शहरात अनेक उद्याने असताना रस्त्याची रुंदी कमी करून लोकांना बसण्यासाठी करण्यात आलेली सोय बुचकळ्यात टाकणारी आहे. या दोन्ही रस्त्यांच्या सुशोभीकरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या काही झाडांवर मात्र संक्रांत आली आहे. नैसर्गिक सौंदर्य नष्ट करून कृत्रिम सुशोभीकरण केले जात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुण्यातील काही निवडक रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे; परंतु जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता म्हणजेच पुणे आहे का? शहरातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेचे काय, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.