इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील शिंदे चौकातील बी. बी. कोपर्डे यांचे राहते घर, कपड्याचे दुकान व गोडाऊन अशा दोन मजली हरी ओम बिल्डिंगला रविवार, ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील शिंदे चौकातील बी. बी. कोपर्डे यांचे राहते घर, कपड्याचे दुकान व गोडाऊन अशा दोन मजली हरी ओम बिल्डिंगला रविवार, दि. 31 रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत सुमारे 4-5 कोटीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
आष्टा पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, रात्री नऊ वाजता दुकान बंद केल्यानंतर पावणेबाराच्या दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच कोपर्डे यांनी नगरपरिषदेला माहिती दिली. नगरपालिका कर्मचारी व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी नगरपालिकेचे 2, इस्लामपूर नगरपालिकेचे 1, सांगली महानगरपालिकेचे 1, हुतात्मा साखर कारखाना वाळवा यांचे 1 अशा अग्निशमन दलाचे 5 गाड्या तात्काळ संपर्क करून घटनास्थळी पाचारण केल्या.
आग लागलेल्या इमारतीचे शटर बंद व आजूबाजूला असलेल्या इमारतीमुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. जवळपास 30 गाड्या पाणी मारुन अग्निशमन दल व ग्रामस्थ यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तातडीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आष्टा पालिका कर्मचार्यांनी जीवाची बाजी लावून रात्रभर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष शैलेश सावंत यांच्यासह पालिका कर्मचारी सचिन मोरे, फरदीन आत्तार, कुमार शिंदे, लखन लोंढे, आर्यन कांबळे, अरुण टोमके, भगवान शिंदे व सहकार्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत विविध प्रकारच्या विक्रीस ठेवण्यात आले कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात फर्निचरही जळाले आहे. परिसरातील नागरिकांनी यावेळी पाहण्यासाठी गर्दी केली होती.