नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा थेट परिणाम पंजाबमधील निवडणुकीवर झ...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा थेट परिणाम पंजाबमधील निवडणुकीवर झाला. पंजाबमध्ये भाजपचे पानिपत झाले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दलही बॅकफुटवर गेले.
दरम्यान, शेतकरी आंदोलन असेच सुरू राहिले, तर लोकसभेच्या किमान 40 जागांवर भाजपला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ महानगरपालिका, 109 नगरपरिषदा, आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. भटिंडाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दलाला मोठा झटका बसला. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष तर अनेक जागांवर खातेही उघडू शकले नाहीत. सत्ताधारी काँग्रेसने मात्र महापालिकांसह नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. भटिंडामध्ये 50 जागांवर झालेल्या निवडणुकीत तब्बल 47 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर अकाली दलाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. भाजप आणि आप तर खातेही उघडू शकले नाहीत. अबोहर नगरपालिका निवडणुकीत 50 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 49 जागा जिंकल्या आहेत, तर अकाली दलाच्या वाट्याला फक्त एक जागा आली.
अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसने भाजपला चितपट केले. सर्व 29 जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानाने निवडून दिले होते; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तिकडे होशियारपूरमध्ये 50 पैकी काँग्रेसने 41 जागांवर विजय संपादन केला. तिथे भाजपच्या खात्यात तीन, आपला दोन जागा मिऴाल्या. अनेक महापालिका, नगरपंचायतींमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. कपूरथला नगरपालिकेत काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. त्याचबरोबर अकाली दलाला तीन, तर दोन अपक्ष निवडून आले आहेत. एका वॉर्डात दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली आहे. या नगरपालिकेत भाजप आणि आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. जालंधरमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. फिल्लौर नगरपरिषदेत काँग्रेसने 14 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला एकाही जागावर यश आले नाही. मोगा येथेदेखील भाजपला खाते उघडता आलेले नाही; मात्र येथे शिरोमणी अकाली दल काँग्रेसच्या पुढे आहे. अकाली दलाला 15 तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला आहे.
भाजप चिंतीत
जाट समाजाच्या नाराजीचा या भागातील लोकसभेच्या 40 जागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. कृषी कायद्यावरुन लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भाजप पदाधिकार्यांना रणनीती बनवण्याची सूचना करण्यात आली आहे.