मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सुरू झालेली शेअर बाजारातील तेजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराने श...
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सुरू झालेली शेअर बाजारातील तेजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी 51 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजी आहे. तसेच बँक निफ्टीने 36 हजाराचा टप्पा पार केला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. कामकाजाच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 417 अंकांची वाढ होत बाजार 51,031.39 वर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 57 अंकांची वाढ होत 14,952.60 वर सुरू झाला. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी दिसत असून दररोज निर्देशांकात विक्रमी वाढ होत आहे.सध्या बँकिग क्षेत्राच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्येही विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी बँक निफ्टीने 36 हजाराचा टप्पा पार केला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
आरबीआयने शुक्रवारी व्याजदर जाहीर केले. व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने बँकेचे शेअर आणखी वधारतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पात बँकिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी उचलण्यात आलेल्या निर्णयांना बाजाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच दोन बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयानेही बँकिंग क्षेत्राच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अर्थसंकल्प सोमवारी सादर झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी आहे. गुरुवारी बाजारात चढउतार होत होती. मात्र, दुपारनंतर बाजारात पुन्हा तेजी आली. गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा 358.54 अंकांची वाढ होत 50,614.29 वर कारभार सुरू होता. तसेच मुंबई शेअर बाजाराचे कॅपिटलायजेशन (सर्व शेअरचे मूल्य) 200 लाख कोटींवर पोहचले आहे. मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी 51,073.27 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. तर निफ्टीने 15,014.65 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. बँक निफ्टीने 36,615.20 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे.