कराड / प्रतिनिधी : पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात येथून सहा किलोमीटरवर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास दोन कार एक...
कराड / प्रतिनिधी : पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात येथून सहा किलोमीटरवर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास दोन कार एकमेकांना ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात असताना अपघात झाला. एका कारने ठोकर दिल्याने दुसरी कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्या पाठोपाठ धडक देणारी कार त्यावर आदळली. त्यात तीन मल्लांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांतील पाचजण जखमी आहेत. त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही कार पुण्याच्या कात्रज भागातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
घटनास्थळ
व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः कोल्हापूर बाजूने पुण्याकडे निघालेल्या कार एकमेकांना ओव्हरटेक करून भरधाव वेगाने निघाल्या होत्या. पाचवड फाटा ते आटके टप्पा दरम्यानच्या एका शॉपीसमोर आल्यावर एका कारची दुसर्याला कारला धडक बसली. त्यात भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांची धडक बसल्याने एक कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्यापाठोपाठ पहिली कारही त्यावर आदळल्याने दोन्ही वाहने चक्काचूर झाली. या अपघातात राहूल प्रल्हाद दोरगे (वय 28), स्वप्नील चंद्रकांत शिंदे (वय 21) रवि साळुंखे (वय समजू शकले नाही, तिघे रा. कात्रज, पुणे) अशी ठार झालेल्या मल्लांची नावे आहेत. तुषार गावडे (वय 23, रा. कात्रज, पुणे) आदित्य ओंबासे (वय 16), चंद्रकांत कावरे (वय 76), पूजा ओंबासे (वय 40) भरत ओंबासे (वय 45), सेजल ओंबासे (वय 18, सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जि. पुणे) जखमी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना कृष्णा व सह्याद्री रूग्णालयात दाखल केले आहे.
अपघात इतक्या जोरात झाला की, त्याच्या आवाजाने परिसर हादरला होता. जोराचा आवाज झाल्याने त्या भागातील नागरिक मदतीला धावून आले. त्या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनीही मदत कार्य राबविले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिसही तेथे पोचले. त्यापाठोपाठ तालुका पोलिसही दाखल झाला होते. महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या सपोनि अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग पोलीस, वाहतुक पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, उदय यादव, मधुकर साळुंखे कर्मचार्यांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. अपघातात पोलिसांकडून जखमींना मदत करण्यासाठी धावपळ सुरू होती. आटके टप्पा ते पाचवड फाट्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.