ना. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ 20 किलोमीटर अंतराची सफर शिराळा / प्रतिनिधी : चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उख...
ना. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ 20 किलोमीटर अंतराची सफर
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उखळु ते उदगीरी या 20 किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
त्यांनी यावेळी मार्गदर्शक फलकाचे अनावरण व प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या 16 गाड्यांचे उद्घाटन केले. वारणावती, ता. शिराळा येथे वन्यजीव विभागाच्या कार्यालयात जंगल सफारीस प्रारंभ झाला. वन्यजीव विभाग चांदोली व उखळू ग्रामविकास समितीतर्फे या जंगल सफारीचे आयोजन केले आहे. सध्या नवीन मार्गासह झोळंबीपर्यंतचा एक मार्ग आहे. या दोन्हींपैकी कोणत्याही एका मार्गावर पर्यटनास जाण्यासाठी पर्यटकांना चांदोली वन्यजीव विभागाकडून रितसर त्यासाठी लागणारे शुल्क भरून परवानगी घ्यावी लागणार आहे.
शिराळा तालुक्यातील झोळंबी येथे एकवीस किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्यातील उखळूपासून उदगिरी पर्यंत ही जंगल सफारी सुरू झाल्याने मणदुर प्रमाणे उखळू येथील पर्यटनास चालना देण्यासाठी तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जंगल सफारीसाठी एकुण 16 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रसंगी वनरक्षक तथा क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण, महादेव मोहिते, उपवनसंरक्षक प्रमोद धानके, साहाय्य वनसंरक्षक बी. एस. घाडगे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता मिलिंद किटवाडकर, महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, वनपाल डी. के. यमगर, एच. ए. गारदी, वनरक्षक अतुल काबंळे, जयसिंग महाडीक, नागरगोजे, गणेश कारंडे, वाहन चालक आनंत मुळे तसेच मणदुरचे सरपंच वसंत पाटील, उखळुचे सरपंच राजू मुटल, मोहन पाटील, राजू वडाम, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वडाम व बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे आदी उपस्थित होते.
जंगल सफरीचा वाहन मार्ग उखळु-उदगिरी या दोन्ही मार्गावरून सफर होणार आहे. यामध्ये जानाईवाडी टॉवर, जनीचा आंबा, तांबवे टॉवर, उदगीरी मंदीर, झोळंबी लपणग्रह, झोंळबी सडा, कोकण दर्शन विठ्ठलाई मंदीर शेवताई मंदीर ही ठिकाणे पाहता येणार आहेत. सफारी साठी प्रवेश वेळ सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल गुरुवारी जंगल सफारी बंद असेल वारणावती तालुका शिराळा येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात शुल्क भरून ही सुविधा घेता येईल.