पुणे : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम...
पुणे : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मंत्रालयात सातव्या मजल्यावरील समिती कक्षात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. ७ गटातील २१ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला होता. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून १७६० स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंग द्वारे ३ नोव्हेंबर रोजी ऑन लाईन झाले होते. उद्योग , मराठी भाषा संवर्धन मंत्री सुभाष देसाई तसेच राज्य शासनातील सर्व मंत्र्यांनी मराठी संवर्धनाच्या या विषयात रस घेऊन स्पर्धा सहभागास प्रोत्साहन दिले. मंदार नामजोशी म्हणाले,' अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल,हा उद्देश होता. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते . जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली . ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली . सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली होती. यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही पारितोषिके म्हणून दिली जाणार आहेत.