मुंबई/प्रतिनिधीः चीनच्या किंवा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही, इतका बंदोबस्त शेतकर्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्य...
मुंबई/प्रतिनिधीः चीनच्या किंवा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही, इतका बंदोबस्त शेतकर्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत, अशा शब्दांत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका केली.
ऊाशी येथील न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. शेतकरी आंदोलनावरुन राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मला असे वाटते, की आंदोलन जरा जास्तच चिघळले आहे. एवढे चिघळण्याची आवश्यकता नव्हती, असे सांगून राज म्हणाले, की तुम्ही जसे ऐकता किंवा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टी पाहता, तसेच आम्हीदेखील पाहतो. शेतकर्यांच्या मागे कोण आहेत?, त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे... वगैरे... पण प्रश्न असा आहे, की, त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारने जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात निश्चित; पण केंद्र सरकारने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी करायला हवी होती. प्रत्येक राज्यामध्ये कृषी खाते आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणे वेगळी आहेत. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज म्हणाले की, कसे आहे शेवटी ताणताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? एक 26 जानेवारी काय घेऊन बसला आहात तुम्ही? शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्वीट रिहानाने केले. ती कोण बाई आहे. मला काही कळाले नाही. कोणतरी कुठेतरी बोलते आणि त्यावर सरकार उत्तर देते. मला सांगा ती ट्वीट करण्यापूर्वी तुम्हाला तरी माहिती होती का? जिच्या एका ट्वीटने तुम्ही सगळेजण तिला काहीतरी बोलता. इतर सगळे म्हणतात, की आमच्या देशाचा प्रश्न आहे. आम्ही सोडवू. तुला नाक खुपसायची गरज नाही; पण मग अगली बार ट्रम्प सरकार असे अमेरिकेत जाऊन भाषण करायची गरज नव्हती, असा टोला त्यांनी मोदी यांना लगावला.