उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते. या देवभूमीत गेल्या काही वर्षांपूर्वी असाच प्रकोप झाला होता. प्रलयकारी पावसाने घरे, दारे, माणसे वाहून नेली ह...
उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते. या देवभूमीत गेल्या काही वर्षांपूर्वी असाच प्रकोप झाला होता. प्रलयकारी पावसाने घरे, दारे, माणसे वाहून नेली होती. आता हिमस्खलन झाल्याने तिथे मोठी जीवितहानी होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीत हिमस्खलनाच्या घटना होतात; परंतु आता उत्तराखंडात जे झाले, ते फारच भयानक आहे. हा धोका केवळ उत्तराखंडपुरताच मर्यादित नाही, तर काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी राज्यांनाही त्यातून बोध घ्यावा लागेल. एकीकडे उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होत असताना दुसरीकडे काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का बसला. हिमालयात वारंवार भूकंप आणि हिमस्खलन होते, हे खरे असले, तरी त्यामुळे होणार्या नुकसानीला आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या काळातही टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहेच. उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याने धौलीगंगा नदीला पूर आला आहे. नदीची तटबंदी तुटल्याने खालच्या भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे.
ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. या वीज प्रकल्पासाठी काम करणारे 150 कामगार सध्या बेपत्ता आहेत. दहा जणांचे मृतदेह सापडले असले, तरी ही प्रारंभिक माहिती आहे. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, इंडो-तिबेट पोलिस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. हिमस्खलानाचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते पाहिले, तर संकट किती गंभीर आहे, याची जाणीव होते. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी जुने व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. हिमस्खलन झाल्याने ऋषिगंगा वीज प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. वाहत्या पाण्याच्या वेगामुळे त्यात अडकलेल्या लोकांचे शोधकार्य करण्यात अडचणी येत आहेत. तपोवन सरोवरातून 16 जणांना वाचविण्यात यश आले आहे. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आहे. पुरी खोर्याचा परिसर रिक्त केला आहे. मृत्यूचा आकडा वाढू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चमोलीचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल कुमार चन्याल यांनी प्रकल्पाच्या ठिकाणचे काही लोक बेपत्ता आहेत, असे मान्य केले; पण अचूक आकडा आत्ताच सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. धौलीगंगा आणि अलकनंदा नदींचा विस्तार पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. तपोवनपासून ते हरिद्वारपर्यंत अति दक्षतेचे इशारे देण्यात आले आहेत. नदीजवळ राहणार्या स्थानिकांना हलवण्यात आले आहे. सैन्य दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसाचे मदत कार्य सुरू आहे. भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. अलकनंदा नदीचा प्रवाह थांबवण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामे करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील रेनी गावात पूरस्थिती परिस्थिती आहे. नदीलगतची तटबंदी आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे जवान लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. जोशीमठाजवळ रेनी गावात मदत कार्य सुरू आहे. उत्तराखंडात हिमस्खलन झाल्याने आणि पुराचा इशारा देण्यात आल्याने उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. तसेच एसडीआरएफलाही अलर्ट केले आहे. गंगा नदीजवळील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पूल, ऋषीगंगा हायड्रोपावर प्रकल्प तसेच अनेकांची घरेही या प्रलयात वाहून गेली आहेत. चामोली पोलिसांच्या माहितीनुसार, हिमकड्याचा कोसळलेला भागाचा राडारोडा हा वेगाने थेट तपोवन भागात आल्याने येथील ऋषीगंगा पावर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. येथून वाहणार्या अलकनंदा नदीच्या किनारी भागात राहणार्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिमनदीच्या सरोवराला पूर येणे म्हणजे असा उद्रेक असतो, ज्यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणावर हिमनग, दगडगोटे आणि माती वाहून येते. तसेच हिमनदीच्या मार्गात असलेले धरण हे पाणी रोखण्यात अयशस्वी ठरल्यास असा उद्रेक होतो. हिमनदीचा उद्रेक होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. यामध्ये बर्फाची झीज होणे, हिमनदीतील पाण्याचा दबाव वाढत जाणे, हिमकडा कोसळणे तसेच बर्फामध्ये भूकंप होणे अशा अनेक कारणांमुळे हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो. त्याचबरोबर हिमकडा कोसळून हिमनदीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो. हिमनद्यांच्या सरोवरांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. ही सरोवरे कोट्यवधी घनमीटर पाणी साठवतात. बर्फ किंवा हिमनदीत गाळ नसल्यामुळे काही मिनिटे, तास किंवा काही दिवस या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने बाहेर पडत असतो. इतर अनेक कारणांमुळेही हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, हिमवृष्टीच्या सरोवराच्या उद्रेकाची थेट कारणे म्हणजे मुसळधार पाऊस, हिमवृष्टी, भूकंप, धबधब्यांप्रमाणे कोसळण्याची प्रक्रिया, दीर्घावधी धरणाचे विसर्ग आणि तलावामध्ये जलद उतार ही असतात. ग्लेशियर खरे तर बर्फाची एक नदी असते, जी मंद गतीने वाहत असते. ग्लेशियर दोन प्रकारचे असतात. यातला पहिला प्रकार म्हणजे, अल्पाइन ग्लेशियर म्हणजेच घाटी किंवा डोंगरांवर असणारे ग्लेशियर आणि दुसरे म्हणजेच बर्फाची चादर. उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेचा संबंध घाटातील ग्लेशियरसोबत आहे. हेच ग्लेशियर जास्त धोकादायक असतात. सध्याच्या काळात पृथ्वीचा दहावा हिस्सा ग्लेशियरने झाकला गेला आहे. ग्लेशियर अशा ठिकाणी असतात, जिथे प्रत्येक वर्षी बर्फ जमा होते आणि त्यानंतर ते वितळू लागते. हा बर्फ पुढे मोठ्या गोळ्यांमध्ये बदलतो. यानंतर पडणारा नवा बर्फ याला आणखी खाली दाबतो आणि ते कठीण होते. यालाच फिर्न असे म्हणतात. या प्रक्रियेत या बर्फाची मात्रा विशाल होत जाते. या दबावामुळे अधिक तापमान नसतानाही हा बर्फ वितळायला सुरूवात होते आणि आपल्याच वजनाने वाहू लागतो. पुढे हेच हिमनदीचे रूप प्राप्त करून घाटीमध्ये वाहायला लागते. घाटांवरील ग्लेशियर अनेकदा धोकादायक होतात. हिमालयात वारंवार हिमस्खलन होते. गेल्या सात वर्षांपूर्वी केदारनाथला झालेले हिमस्खलन ही सर्वांत मोठी घटना होती, ज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यानंतरची रविवारची घटना मोठी आहे. हिमनदीच्या हिमस्खलनामुळे आलेल्या पुराने तपोवन पॉवर प्रोजेक्टचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हिमस्खलनामुळे धौलीगंगा नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. जोशीमठच्या आसपास ही घटना घडली. ग्लेशियर घसरल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तपोवनपासून हरिद्वारपर्यंत नदीकाठच्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमस्खलचा फटका किमान दहा हजार नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. जीवितहानी आणि मालमत्तेची मोठी हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. लष्कर, आयटीबीपीच्या जवानांची मदत बचावकार्यासाठी घेतली जात आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत इथे हिमनद्यांशी निगडीत तीन मोठ्या दुर्घटना घडल्या. त्यातल्या दोन उत्तराखंडमध्ये झाल्या आहेत. त्यातील केदारनाथच्या घटनेत जीवित आणि वित्तहानी मोठी होती. केदारनाथ, एव्हरेस्ट आणि नंदादेवी हिमस्खलन या तिन्ही दुर्घटना तीन वेगवेगळ्या मोसमांत वेगवेगळ्या कारणांनी झाल्या; पण त्यात काही साम्य आहे. त्यामुळेच हिमालयातील हजारो वर्षांपासूनचे बर्फाचे आच्छादन किती नाजूक बनले आहे, हे प्रत्ययाला येते.