अहमदनगर/प्रतिनिधी : भावाच्या मदतीने पती संतोष याचा खून करण्यात आल्याचा प्रकार वाळुंज येथे घडला. संतोषचा भाऊ संदीप यांनी दिलेल्या फिर्यादीवरू...
अहमदनगर/प्रतिनिधी : भावाच्या मदतीने पती संतोष याचा खून करण्यात आल्याचा प्रकार वाळुंज येथे घडला. संतोषचा भाऊ संदीप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत संतोष यांची पत्नी प्रियंका ऊर्फ शारदा संतोष मोरे व तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दोघांना अटक केली. वाळुंज-पारगाव येथील संतोष मोरे (रा. वाळुंज) यांच्याशी प्रियंकाचा विवाह झाला होता. त्यांना तीन मुले झाली; मात्र नंतर घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. ते विकोपाला गेले होते. दोघांमध्ये शनिवारी (ता. 20) किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हे भांडण सोडविण्यासाठी प्रियंकाने भाऊ रामेश्वरला बोलाविले होते; मात्र नंतर वाद वाढत गेल्याने संतापलेल्या रामेश्वर याने कुर्हाडीचा घाव मेहुणा संतोष यांच्या डोक्यात घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूबद्दल प्रियंकाला विचारणा केली असता, सुरवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर भावाने पतीच्या डोक्यात कुर्हाडीचा वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.