अहमदनगर/प्रतिनिधीः आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे यांची, तर उपसरपंचपदी पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, माजी म...
अहमदनगर/प्रतिनिधीः आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे यांची, तर उपसरपंचपदी पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसने सरपंचपद पटकावले आहे. बुर्हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिलेे यांची निवड झाली आहे, तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.
हिवरबाजार ग्रामपंचायतीची 30 वषार्नंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पवार यांनी वर्चस्व सिद्ध केले होते. उदरमल ग्रामपंचायतीत सातपैकी सहा जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. प्रा. शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी पवार गटाचेच कल्याण रामभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. या निवडणुकीत प्रथमच शिंदे गटाचा पराभव झाला. नऊपैकी सात जागा आमदार पवार गटाला मिळाल्या होत्या, तर शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत पवार गटानेच बाजी मारली आहे.