अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा (ता. नेवासे) परिसरात शिर्डीहून नेवाशामार्गे औरंगाबादकडे जाणारी कार महामार्गावरील दु...
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा (ता. नेवासे) परिसरात शिर्डीहून नेवाशामार्गे औरंगाबादकडे जाणारी कार महामार्गावरील दुभाजक पार करीत दुसर्या वाहनाला धडकली. नगरकडे जात आलेल्या ट्रॅव्हल बसला समोरून तिची धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले.
हे सर्व जालन्याचे होते. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहेत. ते शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घटना घडली. कार धडकल्यानंतर ट्रॅव्हल बसला पाठीमागून येणारा टेम्पोही धडकला; मात्र चालकाच्या प्रसंगावधनामुळे दुसरा मोठा अपघात टळला. यात टेम्पोचे किरकोळ झाले आहे. दरम्यान याच महामार्गावरील दोन दिवसांपूर्वी दोन दुचाकीस्वार अज्ञात वाहनांच्या धडकेने ठार झाल्याची घटना घडली होती. शंतनू नायबराव काकडे ( वय 22, राहणार जयपूर, ता. मंठा, जिल्हा जालना), कैलास विठ्ठल नेवरे (वय 23), रमेश दशरथ घुगे (वय 22), विष्णू उद्धवराव चव्हाण (वय 22, तिघे राहणार मेसखेडा, ता. मंठा , जिल्हा जालना), नारायण दिगंबर वरकड (वय 24, रा. लाळतोंडी, ता. मंठा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे मित्र शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन नेवाशामार्गे औरंगाबादकडे जात असताना सोमवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास त्यांची कार (एमएच 21 बीएफ 7178) महामार्गावरील दुभाजक पार करून औरंगाबादहुन नगरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल (एमएच 19 वाय 7123) बसला देवगड फाटा परिसरात धडकली. यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच नेवासे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते हे पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी पोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून व अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून तब्बल तासभर झालेली वाहतूक कोंडी फोडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी मृतांजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून मृतांच्या ओळखी पटविण्यात यश मिळवले. दरम्यान, घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलिस अधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी भेट देऊन पाहणी केली.