भागा वरखडे/अहमदनगर ः अहमदनगर शहर सहकारी बँकेचे एकाचे चेक दुसर्याच्या नावावर जमा करण्याचा एक नवाच पायंडा पाडला आहे. सहकार खात्याच्या चौकशीत ...
भागा वरखडे/अहमदनगर ः अहमदनगर शहर सहकारी बँकेचे एकाचे चेक दुसर्याच्या नावावर जमा करण्याचा एक नवाच पायंडा पाडला आहे. सहकार खात्याच्या चौकशीत हे सिद्ध झाले आहे. ही चूक एकदा झाली असती, तर ती क्षम्य समजता आली असती; परंतु सहा वेळी असे झाले असून, त्यातून दोन कोटी 28 लाख 77 हजार 865 रुपये संबंधित व्यापारी फर्मला न जाता वेगळ्याच खात्यावर जमा करण्याचा अजब प्रकार केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत सहायक निबंधकांनी बँकेच्या व्यवस्थापकाला जबाबदार धरले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांची चौकशीही अंतिम टप्प्यात आल्याचे समजते.
बाबुलाल बच्छावत यांनी अहमदनगर शहर सहकारी बँकेतून तीन कोटी रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी घेतले होते. त्यातून त्यांनी 26 लाख 45 हजार रुपये आरटीजीएस केले. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे 31 मार्चला सरकारी कर वगळता अन्य कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. तसेच 31 मार्च 2019 रोजी रविवार असल्याने बँकेला सुटीच होती. असे असताना अहमदनगर शहर सहकारी बँकेने मात्र सुटीच्या दिवशी बच्छावत यांच्या खात्यातून दोन कोटी 28 लाख 77 हजार 865 रुपये इतरांच्या खाती जमा केले. त्यातही बँकेकडे तक्रारी केल्या असताना तिने दिलेली उत्तरे गोंधळ वाढवणारी होती. मुळात वीस हजारापेक्षा रोख रक्कम काढता येत नाही. तसेच बँकिंग प्रणालीत बेअरर क्रॉस चेक ही संकल्पनाच अस्तित्त्वात नसताना बँकेने मात्र ही प्रणाली वापरल्याचे सांगितले. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या या चुकीच्या कामकाजामुळे कर्जदाराला दोन कोटी 29लाखांना फटका बसला. त्याने सहायक निबंधकांकडे धाव घेतली. तिथे बँकेने म्हणणे मांडताना सर्व व्यवहार बँकेच्या नियमावलीनुसार झाल्याचे सांगितले; परंतु सहायक निबंधकांनी चौकशी अहवालात बँकेच्या व्यवस्थापकावर ठपका ठेवला. बँकेने काही ठिकाणी म्हणणे मांडताना क्रॉस बेअरर तर काही ठिकाणी बेअरर चेक असा शब्दच्छल केला आहे. सहायक निबंधकांनीही बँकिंग प्रणालीत क्रॉस बेअरर चेक ही संज्ञाच नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रशांत चिपाडे यांची कर्जदार बाबुलाल बच्छावत यांच्यांशी ओळख असली, तरी बिकाजी फूडस् इंटरनॅशनल (41 लाख रुपये), आरएमसी मार्केटिंग (35 लाख रुपये), ए. जी. ई. इंडिया (25 लाख 38व हजार 932 रुपये), मनपसंद बिव्हरेज (25 लाख 38 हजार 932 रुपये), बिकाजी फूडस् (पन्नास लाख रुपये), आरएमसी मार्केटिंग (52 लाख रुपये) अशा नावाने काढलेले सर्व चेक 31 मार्च या एकाच दिवशी प्रशांत चिपाडे यांच्या एमआयडीसी शाखेतील खात्यात कसे जमा होऊ शकतात, या प्रश्नाचे उत्तर बँकेला देता आले नाही. कर्जदाराच्या या फसवणुकीस बँक जबाबदार आहे, हे आता चौकशीत स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे नमूद करून कारवाई करण्याचे मात्र टाळण्यात आले आहे. पोलिसांत 15 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला असताना पोलिसांची कारवाईही धीम्या गतीने चालू आहे; परंतु आता ती अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.