जन्माला आले, म्हणजे मृत्यू येणारच असे म्हणत मृत्यूला कवटाळणे महागात पडते. आपल्या चुकांमुळे मृत्यूला निमंत्रण दिले जात असते. गेल्या तीन दिवसा...
जन्माला आले, म्हणजे मृत्यू येणारच असे म्हणत मृत्यूला कवटाळणे महागात पडते. आपल्या चुकांमुळे मृत्यूला निमंत्रण दिले जात असते. गेल्या तीन दिवसांतील अपघाताच्या घटना पाहिल्या, तर त्यात योगायोग कमी आणि मानवनिर्मित चुकांचे मृत्यू जास्त अशी स्थिती दिसते. कांगोत जहाज बुडून त्यातील चारशे लोकांना मृत्यूने गाठले. परदेशातील घटना बाजूला ठेवली, तरी देशांत गेल्या तीन दिवसांत अपघात झालेले अपघात लक्षात घेतले, तरी त्यातील बळींची संख्या जास्त आहे. आंध्र प्रदेशातून अजमेरला जाणार्या मिनी बसला झालेल्या अपघातात 14 जणांचे बळी गेले. त्यानंतर जळगावातील रावेर तालुक्यात पपईची वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात 15 जणांचा बळी गेला. त्यात एकाच कुटुुंबातील दहा जणांचा समोवश आहे. अपघातातील बळींची परिस्थिती पाहिली, तर ते सर्व गरीब कुटुंबातील आहेत. मध्य प्रदेशात घडलेला अपघात तर हृदयाला पाझर फोडणारा आहे. आयुष्याची स्वप्ने पाहणार्या, नोकरीसाठी धडपडणार्या आणि रेल्वेची परीक्षा द्यायला निघालेल्या तरुणांच्या रेल्वेच्या पेपरअगोदर आयुष्याचा पेपर अगोदरच संपला. मध्य प्रदेशात मंगळवारी एक बस कालव्यात कोसळून अपघात झाला. जीवनात शॉर्टकट उपयोगी नसतो. तसाच तो रस्त्याचा शार्टकट ही उपयोगाचा नसतो. तो जीवघेणा ठरू शकतो. मध्य प्रदेशात मंगळवारी झालेला अपघात हा शॉर्टकटमुळे झाला. या अपघातात बसमधील 47 प्रवाशांचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यातील बहुतांश जण विद्यार्थी होते. हे विद्यार्थी रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जात होते; मात्र ही परीक्षा देण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पेपर संपला. ही बस मंगळवारी सकाळी सतानच्या दिशेने जात होती. तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कालव्यात जाऊन कोसळली. बस खोल कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवले. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले; मात्र इतर प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे. या बसमधील लोक सकाळची वेळ असल्याने झोपेत होते. त्यामुळे बस पाण्यात पडल्यानंतर या लोकांना झटपट हालचाल करता आली नाही. कालव्यातील पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता. त्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवायची संधी मिळाली नाही. एरव्ही रिवा आणि सतानला जाणार्या या बसमध्ये फारशी गर्दी नसते; मात्र परीक्षा असल्यामुळे बसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. तसेच सतानला जाताना ही बस छुहिया घाटातून जाते; मात्र मंगळवारी ही बस नेमकी कालव्याच्या मार्गाने गेली. ही बस अत्यंत वेगात होती. रस्त्यावरील एक गतिरोधक पार करताना चालकाचे नियंत्रण सुटले. ती कालव्यात जाऊन कोसळली. त्यावेळी कालव्यात बरेच पाणी असल्याने बस लगेच बुडाली. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस कालव्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भारतातील रस्ते अपघात आणि त्यात होणार्या मृत्यूंना केवळ वाहनांची वाढती संख्या जबाबदार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शंभर लोकांमागे सर्वांत कमी वाहने असतानाही अन्य देशांच्या तुलेनत भारतातील रस्ते अपघातांतील मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रस्ते अपघातांची योग्य पद्धतीने कारणमीमांसा करून, त्यावर उपाययोजना करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) ’ट्रान्स्पोर्टेशन रिसर्च अँड इन्ज्युरी प्रिव्हेन्शन प्रोग्रॅम’अंतर्गत ’भारतातील रस्ते वाहतूक सुरक्षा अहवाल’ तयार केला आहे. अहवालानुसार भारतात खासगी वापरासाठी तीन कोटी कार आणि 17 कोटी दुचाकींची नोंद आहे; मात्र प्रत्यक्षात त्यापैकी 50 ते 55 टक्के वाहने विविध कारणास्तव वाहतुकीतून बाद झाली असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ भारतातील सुमारे नऊ कोटी वाहने कालबाह्य झाली आहेत. आता सरकारने आणलेल्या स्कॅप धोरणात ही वाहने काढून घेण्यात येणार आहेत. वाहन संख्येपेक्षाही कमी वाहने देशात धावत आहेत; तरीही अपघातांची आणि मृतांची संख्या जास्तच आहे, ही गंभीर बाब आहे. रस्ते अपघात अहवालानुसार, 2018 या वर्षात एक लाख 51 हजार 417 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे, तर चार लाख 69 हजार जण जखमी झाले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रायलाच्या 2019 च्या रस्ते अपघात अहवालानुसार देशात एकूण रस्ते अपघातात शहरी भागात मृतांची संख्या 51 हजार 379 (34 टक्के) आणि ग्रामीण भागात एक लाख 38 हजार (66 टक्के) इतकी आहे.भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोनच दिवसांपूर्वी तीस टक्के वाहन परवाने बोगस असल्याचे सांगितले होते. तसेच रस्त्याच्या दुरवस्थेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते जबाबदार आहेत, असे म्हटले होते. रस्त्यातील खड्डे, रस्त्याचा आकार, गतिरोधकांची रचना, जीवघेणी वळणे आदी कारणामुळे अपघात होत असतात. रस्ते अपघाताला वाहनांची दुर्दशा कारणीभूत ठरते, त्यासाठी विविध योजनांची गरज असते. वाहनाचे डिझाइन आणि प्रत्यक्ष निर्मिलेले वाहन यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे. वाहनांच्या ’टाइप ऑफ अप्रूव्हल’मध्ये कालसुसंगत बदल आवश्यक आहेत. वाहनांचे फिटनेस आणि इन्स्पेक्शन केवळ स्वयंचलित केंद्रांवर करावे. भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्या दुर्दैवी जीवांच्या संख्येत 2020 पर्यंत निम्म्याने घट करण्याचे वचन दिले होते. आपण त्या उद्दिष्टाच्या आसपासदेखील आलेलो नाही. स्टॉकहोम परिषदेत ‘डिलिव्हरिंग रोड सेफ्टी इन इंडिया’ या शीर्षकाचा एक अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालातून भारतातील रस्ते सुरक्षिततेची लक्तरेच वेशीवर टांगण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हा अहवाल सादर झाला, त्याच दिवशी भारतात चार वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल 35 जणांचे बळी गेले! या अहवालात भारतातील रस्ते अपघातातील बळींची मोठी संख्या, तसेच रस्ते सुरक्षितता कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यातील अनास्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालात केवळ चिंताच व्यक्त करण्यात आली नसून, रस्ते अपघात व बळींची संख्या घटविण्यासाठी समर्पक गुंतवणूक प्राधान्यक्रमदेखील सुचविण्यात आला आहे. भारताला रस्ते अपघातांमधील बळींची संख्या निम्म्यावर आणण्यासाठी आगामी दोन दशकात तब्बल 109 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 7700 अब्ज रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ढोबळमानाने ही रक्कम वार्षिक 5.50 अब्ज डॉलर्स एवढी होते. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी काही दिवसांपूर्वीच सादर केलेल्या अर्थसंकल्पात, शिक्षण क्षेत्रासाठी 14 अब्ज डॉलर्स, कृषी क्षेत्रासाठी 33 अब्ज डॉलर्स, तर आरोग्य क्षेत्रासाठी 9.7 अब्ज डॉलर्स एवढी तरतूद करण्यात आली आहे. रस्ते अपघात व बळींची संख्या घटविण्यासाठी भारताला किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल, हे या तुलनेवरून लक्षात येईल. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात प्राण गमावतात, तर सुमारे 7.5 लाख लोक गंभीररित्या जखमी होतात वा त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व येते. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दहा पट आहे. एक देश म्हणून मानवी जीवनाप्रती आपण किती असंवेदनशील आहोत, हे या आकडेवारीवरून सहज लक्षात येते. रस्ते अपघातांमुळे केवळ जीवितहानीच होते असे नव्हे, तर वित्तहानीदेखील होते.