नागपूर/प्रतिनिधी : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू करण्या...
नागपूर/प्रतिनिधी : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात हे संकेत दिले. वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली जाऊ शकते.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले जात आहे; मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार केला जात आहे. सर्वसामान्यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी लावणे, गर्दीत जाणे टाळणे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लग्नाचे हॉल किंवा विवाह समारंभांशी संबंधित कार्यालयांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. त्यानंतरही कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशाचप्रकारे सातत्याने वाढ झाली, तर मग पूर्णपणे टाळेबंदी केली जाऊ शकते.