नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेल...
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी महाराजांनी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित करून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होय. शिवाजीराजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. महाराज जगातील अनेक उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगभर एक प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केली. म्हणजेच शिवाजी महाराजांचे राज्य लोकाभिमुख होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजाला छत्रपतींच्या स्वराज्यात सुखी ठेवले. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य असल्याचेही ते म्हणाले.