कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांचा पुतण्या खासदार अभिषेक बनर्जी या...
कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांचा पुतण्या खासदार अभिषेक बनर्जी यांच्या पत्नी विरोधात चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांना नोटीस देण्यासाठी सीबीआयची टीम कालीघाट येथील त्यांच्या घरी पोहोचली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या टीममध्ये पाच जणांचा समावेश होता.
कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयची टीम अभिषेक यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी पोहोचली; मात्र त्या वेळी घरी कोणीही नव्हते. यामुळे सीबीआयची टीम नोटीस घरावर चिकटवून परतली आहे. सीबीआयला रुचिरा यांची चौकशी करायची आहे. सीबीआयला रुचिरा यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा संशय आहे. नोटीसमध्ये सीबीआयने रुचिरा यांना चौकशीत येण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. सीबीआयची टीम घरी येऊन चौकशी करेल, असे म्हटले आहे. सीबीआयच्या अधिकार्यांनी नोटीसमध्ये फोन नंबर दिले आहेत. त्यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. कोळसा तस्करीसह इतर घोटाळ्यांमध्ये अभिषेकचा समावेश असल्याचा आरोप भाजप करतो. भाजपच्या नेत्यांकडून अभिषेक यांना ममता यांच्याकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात येतो. तृणमूल काँग्रेस आणि अभिषेक सातत्याने भाजपचे आरोप फेटाळत आहेत. कोळसा घोटाळ्याप्रकरणी तपास करताना सीबीआयला रुजिरा यांच्या खात्यात व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सीबीआयला रुचिरा यांची चौकशी करायची आहे. सीबीआयनं कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालमधील 4 जिल्ह्यांमध्ये 13 ठिकाणी छापे टाकले होते. पुरुलिया, बांकुड़ा, पश्चिम बर्धमान आणि कोलकातामध्ये सीबीआयने चौकशी केली आहे. पोलिस आणि सीबीआय कोळसा घोटाळ्यातील अनूप मांझीची चौकशी करत आहे. अनुप मांझी विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अभिषेक यांचे निकटवर्तीय विनय मिश्रा यांचे नावदेखील या प्रकरणी समोर आले होते.