भारतातील एकही विद्यापीठ आणि अन्य संस्था जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांत नाही. भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत नाही, म्हणून दरवर्षी हजारो...
भारतातील एकही विद्यापीठ आणि अन्य संस्था जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांत नाही. भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत नाही, म्हणून दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशात शिकायला जातात आणि नंतर अशी बुद्धीमान मुले तिकडचीच होऊन जातात. त्याला ब्रेन ड्रेन असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून आपण ब्रेन ग्रेनची भाषा करीत आहोत; परंतु गेल्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी झालेली अल्पशी तरतूद पाहिली, तर आपल्याला ब्रेन ड्रेनचा आणखी काही काळ तरी सामना करावा लागू शकतो.
अगदी कोठारी आयोगापासून शिक्षणाच्या सुधारणासाठी अनेक आयोग आले. शिक्षणाचे बाजारीकरण रोखून गुणवत्ता वाढीवर लक्ष देण्याच्या अनेक सूचना करण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात त्यापैकी किती सूचनांची अंमलबजावणी झाली, हा संशोधनाचा वेगळा मुद्दा आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के तरतूद शिक्षणासाठी करण्याची सूचना वारंवार करूनही तिची अंमलबजावणी झालेली नाही. आजूबाजूला स्पर्धेचे वातावरण असताना ताण येणेही साहजिकच आहे; पण मार्कांना अवाजवी महत्त्व दिले जाते. परीक्षा म्हणजे सर्वकाही नाही. यासाठी कोणताही ताण न घेता परीक्षेला आपण शांतपणे, आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे. परीक्षेत मला चांगले टक्के मिळाले नाही, तर आईवडील नाराज होतील, चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार नाही, मला हव्या त्या शाखेला प्रवेश मिळवता येणार नाही अशी अनेक प्रकारची भीती किंवा प्रश्न एकीकडे असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे देण्यात आपण कमी पडतो आहोत, हे मान्य करायला तयार नाही. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिकता आले नाही. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, हे समजण्यासारखे आहे; परंतु अशा वेळी त्यांना चुकीचेो सल्ले देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना किती अभ्यासक्रम शिकविला, तेवढ्याच अभ्यासक्रमावर प्रश्न विचारून परीक्षा घेणे हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. दुसरा उपाय विद्यार्थ्यांचे गेल्या शैक्षणिक वर्षात नुकसान झाले. त्यांना मनासारखा अभ्यास करता आला नाही. असे असले, तरी यशाला शॉर्टकट नसतो, हे लक्षात ठेवावे लागेल. दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या वयात एक वर्ष वाढ करावी लागेल. त्याबाबत केंद्र व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, तो मात्र घेतला जात नाही.
भारतीय शिक्षण पद्धतीत दहावी व बारावी या दोन परीक्षांना प्रचंड महत्व देण्यात येते. या दोन्ही परीक्षानंतरच करीयरचा मार्ग सापडतो किंवा निश्चित होतो, अशी विद्यार्थी व पालकांची धारणा असल्याने स्वाभाविकपणे या परीक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांसह पालकांनाही असतेच. चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी जास्त गुण मिळविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी दडपणाखाली अभ्यास करतात. यामुळे त्यांना कदाचित चांगले गुण मिळतातही; मात्र त्यांना ज्ञान मिळते का? या प्रश्नाचे उत्तर बारावीत 90 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी जेव्हा पहिल्याच सेमिस्टरला नापास होतो, तेव्हा मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी मनावर दडपण न घेता परीक्षा दिली पाहिजे. परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे परीक्षा हा आपल्या संपूर्ण आयुष्यातला एक छोटासा भाग असतो. यामुळे परीक्षेत किती गुण मिळतील, याची चिंता करण्याचे कारण नाही. परीक्षेचा ताण जेवढा हलका होईल तितके विद्यार्थ्यांना यश मिळवणे सोपे जाते. परीक्षेतील यश म्हणजे यशस्वी आयुष्य असे जे काही समीकरण तयार झाले आहे. ते बदलण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने शाळांमधून आणि घराघरातून या परीक्षेचा जो काही बाऊ केला जातो. त्यामुळे निखळ यशापेक्षा उत्तीर्ण होण्याचा किंवा गुणवत्तेचा पराकोटीचा आग्रह पाहायला मिळतो. आपल्या मुलांनी चांगले टक्के मिळवावेत अशी पालकांची अपेक्षा चुकीची नाहीच; पण त्याबरोबरीने आपण हे लक्षात घ्यायला हवे, की आपल्या सततच्या काळजीची मुलांनाही भीती वाटू शकते. त्यांच्यावर वेगळे दडपण येते. म्हणूनच त्यांच्या मागे सतत अभ्यास कर म्हणून मागे लागणे किंवा त्याची तुलना इतर कुणाशीतरी करणे पुर्णपणे चुकीचे आहे. मुलाला आपली भीती न वाटता आधार वाटला पाहिजे, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. सततचा तणाव आणि दबाव यांनी मुलांना नैराश्य येण्याची शक्यता असल्याने पाल्यांकडून अपेक्षा ठेवतांना त्याची आवड काय, त्याची क्षमता किती याचाही विचार करावा. पालकांनी आपल्या मुलांच्या यशाचा संबंध स्वतःच्या प्रतिष्ठेशी लावू नये. यामुळे मुलांच्या मनावर दडपण येण्याची शक्यता असते. परीक्षा हा केवळ संपूर्ण जीवनातला एक टप्पा असतो. तो पार करताना यश आले तर ठीक. नाही आले तरी निराश होण्याचे कोणतेही कारण नसते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातील दोन बातम्या मनाला चीड आणायला लावणार्या आहेत. त्याचबरोबर शिक्षणाचे मातेरे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षकच कसे करीत आहेत, यावर प्रकाश टाकणार्या आहेत. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी त्यांना चुकीच्या मार्गावर नेणार्या आहेत. उत्तरपत्रिका तपासताना परीक्षक किती घोळ घालतात, याची उदाहरणे भरपूर आहेत. प्रश्नाच्या उत्तराऐवजी गाणे लिहिले, तरी कसे गुण मिळाले, हे शपथेवर सांगणारे अनेक विद्यार्थी भेटतील. त्यामुळे एकूणच आपल्या मूल्यांकन पद्धतीत किती गुणदोष आहेत, हे समजते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे येत नसतील, तर काहीही लिहा; परंतु उत्तरपत्रिका कोरी सोडू नका, असा अजब सल्ला देण्यात आला. त्यावरची शाई वाळत नाही, तोच दिल्लीतील शिक्षण विभागाच्या संचालकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कींगवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सल्ला देताना दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या संचालकांनी मुलांना परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे उत्तर ठावूक नसेल तर प्रश्नच पुन्हा लिहून या असेही या व्हिडीओमध्ये संचालकांनी मुलांना सुचवले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये उदित प्रकाश राय हे एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. मी शिक्षक आणि केंद्रीय शिक्षण विभागाशीही बोललो असून त्यांना विद्यार्थ्यांनी काहीही लिहिले, तरी गुण द्यावेत असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नच लिहून काढला तरी त्यांना गुण देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे राय सांगताना दिसत आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये, असा होतो. विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यात आले. आम्ही सीबीएसईलाही सांगितले आहे, की मुलांनी काहीही लिहिले तरी त्यांना गुण द्या, असे राय यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने राय यांच्यावतीने स्पष्टीकरण देताना त्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असे म्हटले आहे. तसेच राय यांनी हे वक्तव्य मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी केले होते असेही म्हटले आहे. हे शैक्षणिक वर्ष खूपच निराशाजनक राहिले आहे. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी ते त्यांच्याशी चर्चा करत होते. अनेक विद्यार्थ्यांना आता लिहिण्याची सवय राहिलेली नाही. ते खूपच थेटपणे मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना या वक्तव्यामुधून मुलांनी निराश होऊ नये असे सांगायचे होते, अशी मखलाशी त्यांनी केली.