कोपरगाव/ता.प्रतिनिधी ः कोपरगांव तालुक्यात रब्बी हंगामातील गहू,ज्वारी व हरभरा या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असून शेतकरी बांधवांना पिका...
कोपरगाव/ता.प्रतिनिधी ः कोपरगांव तालुक्यात रब्बी हंगामातील गहू,ज्वारी व हरभरा या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असून शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यासाठी सध्या पाण्याची अडचण भासत आहे. पिकांना पाणी देणे गरजेचे असल्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी मिळावे अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
यावेळी कोल्हे म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचा लपंडाव सुरू आहे. शिवाय आधीच जगासह संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने थौमान घातलेले असल्यामुळे हातात असलेली पिके ही योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. खरीप वाया गेला. कशीबशी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली असून त्यातच पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांना तातडीने पाणी मिळणेकरीता गोदावरी कालव्यांना तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. राज्यात चालू वर्षी समाधानकारक पाऊस होऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतांना देखील पाणी सोडण्यास उशिर न होता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकरी बांधवांना व्हावा म्हणून जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे.पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार आहे त्यामुळे उशिरा सोडलेल्या पाण्याचा शेतकरी बांधवांना काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे अशी आग्रही मागणी कोल्हे यांनी केली आहे.